tvlog02ठाणे परिसरात आता शेकडो वाचनालये आहेत. मात्र टेंभीनाक्यावरचे ठाणे नगर वाचन मंदिर हे जिल्ह्यातील सर्वात जुने आणि पहिले वाचनालय आहे. १८५० मध्ये हे वाचनालय सुरू झाले. तब्बल १६५ वर्षे अविरतपणे हे ग्रंथालय वाचन संस्कृतीचा प्रसार करीत आहे. ठाण्याचे जणू काही ते एक वाचनीय असे मंदिरच आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत १९ व्या शतकात सरकारी अधिकारी, डॉक्टर्स, वकील मंडळींसाठी नेटिव्ह वाचनालयाची स्थापना करण्यात आली होती. सुरुवातीला हे वाचनालय जनरल नेटिव्ह लायब्ररी या नावाने ओळखले जाई. कालांतराने संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष डब्लू. बी. म्युलक यांच्या नावावरून म्युलक लायब्ररी अशी ठाणे नगर वाचन मंदिरची ओळख होती. इंग्रजी भाषा शिक्षणाकडे ओढा असल्यामुळे इंग्रजी पुस्तकांचे ग्रंथालय म्हणूनही या संस्थेची ख्याती होती. आता इंग्रजीसोबतच अनेक मराठी ग्रंथांचे तसेच नाटक, इतिहास, संकीर्ण संदर्भ, इंग्रजी, समीक्षा असे वेगवेगळ्या प्रकारचे ५३ विभाग इथे आहेत. विनायक कीर्तने यांचे १८७६ साली लिहिलेले ‘जयपाल’ हे नाटक, १९१२ साली लिहिलेले ‘तोतयाचे बंड’ हे नाटक, संगीत विभागातील बाळकृष्ण दाभाडे लिखित ‘कलासाधना’ अशी अनेक दुर्मीळ पुस्तके येथे पाहायला मिळतात.
दैनिके / मासिके विभाग
मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतील एकूण २० दैनिके तसेच साप्त शोधन, नव संदेश, विवेक, इंग्रजीतील आऊटलूक, संडे मिड डे ही साप्ताहिके तर फ्रंटलाइन, बिझनेस इंडिया यांसारखी पाक्षिके; याशिवाय मुक्त शब्द, योगासिद्धी, साहित्यसूची, स्पर्धापरीक्षा, विमर्ष ही मराठीतील एकूण ५६ मासिके या विभागात उपलब्ध आहेत. ग्रंथालयातील कोश विभाग अतिशय समृद्ध आहे. विश्वकोशाचे, संस्कृतिकोशाचे अनेक खंड या विभागात जतन केलेले आहेत. १९०४ मध्ये महादेवशास्त्री यांनी लिहिलेला मुलांचा संस्कृतिकोश तसेच विद्याधर वामन भिडे यांनी १९९० मध्ये लिहिलेले मराठी भाषेचे वाक्प्रचार म्हणी हे कोश जतन करून ठेवलेले आहेत.
धर्म / राज्यशास्त्र विभाग
धर्म आणि राज्यशास्त्र विभागातही ‘भारतीय न्यायव्यवस्था’ हे १८६८ मध्ये वि. ना. गाडगीळ यांनी लिहिलेले पुस्तक, तर धर्म विभागात १८४९ साली स. कृ. फडके यांनी लिहिलेले ‘नवयुग धर्म’, दामोदर सावळाराम यांनी १८५१ साली लिहिलेले ‘श्रीमद्भागवत’ हे ग्रंथ आजही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. धर्म विभागातील डॉ. शांताराम आपटे यांनी लिहिलेला ‘वैदिक आन्हिक’ हा दुर्मीळ धर्मग्रंथ ठाण्यात झालेल्या साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीत ठेवण्यात आला होता. १८६७ मध्ये विष्णू वामन बापट यांनी लिहिलेली ‘कथा सरीत्सागर’, तर काव्य विभागात दत्तात्रय आपटे यांनी १८४८ साली लिहिलेले ‘हृदयतरंग’, श्रीकृष्ण चाफेकर १८५० साली लिहिलेले आणि त्या काळी १ रुपया किंमत असलेले ‘सुवर्ण चंपक’ हा काव्यसंग्रह आजही या विभागातील संग्रहात आहे. सभासद होताना २५० रुपये अनामत रक्कम, पाच रुपये प्रवेश शुल्क भरावे लागते. मासिक वर्गणी ३० रुपये आहे. पाचशे रुपये अनामक रक्कम भरल्यास एकाच वेळी दोन पुस्तके ग्रंथालयातर्फे दिली जातात. सहा हजार रुपये भरून आश्रयदाते, तर तीन हजार रुपये भरून आजीव सभासद होता येते.
सांस्कृतिक कार्यक्रम / मान्यवर भेट
गेली अनेक वर्षे वाचनालयातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महिला व लहान मुलांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच वेगवेगळ्या विषयांवर अनेक मान्यवर साहित्यिकांचा सहभाग असलेल्या व्याख्यानमाला रसिकांसाठी भरवल्या जातात. गो. नी. दांडेकर, विजय तेंडुलकर, शंकर वैद्य,  कथाकथनकार मुग्धा चिटणीस, विश्राम बेडेकर, गिरिजा कीर असे अनेक मान्यवर साहित्यिक, विचारवंतांनी या ग्रंथालयात व्याख्याने दिली आहेत. ग्रंथालयाचे विद्यमान अध्यक्ष यशवंत साने असून त्यांच्या अध्यक्षतेखाली ११ एप्रिल रोजी संस्थेचा १६५ वा वर्धापन दिन साजरा केला गेला. या वर्धापन दिनी साहित्यिक डॉ. मीना वैशंपायन यांचे ‘दुर्गा भागवत : व्यक्ती आणि वाङ्मय’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. १६५ वर्षे साहित्याची परंपरा जपणारे हे ठाणे नगर वाचन मंदिर ठाणेकरांसाठी नक्कीच साहित्याचा दुर्मीळ ठेवा आहे.
किन्नरी जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वजनिक वाचनालय, कल्याण</strong>
पत्ता- कल्याण सार्वजनिक वाचनालय, कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर, कल्याण (प).

सार्वजनिक वाचनालय, कल्याण</strong>
पत्ता- कल्याण सार्वजनिक वाचनालय, कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर, कल्याण (प).