लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचे काम रविवारी सकाळी ७.३० वाजता पूर्ण झाले असून येथील शिफ्ट करण्यात आलेल्या रेल्वेरुळांवरून रिकामी रेल्वेगाडी चालविण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली आहे. या रुळांची पुन्हा एकदा पाहणी करून त्यानंतर येथून सायंकाळी प्रवाशांनी भरलेली रेल्वेगाडी जाईल. त्यामुळे आज सायंकाळी हा फलाट प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.
मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सहा लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. फलाट क्रमांक पाच आणि सहा येथे जलद मार्गाच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांना थांबा आहे. येथे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील थांबतात. त्यामुळे प्रवाशांची गर्दी अधिक होत असते. अनेकदा गर्दी वाढल्यास चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे शुक्रवारपासून फलाट क्रमांक पाचचे रुंदीकरण करण्यास सुरूवात केली आहे. रेल्वेचे सुमारे ५५० ते ६०० अधिकारी, कर्मचारी, मजूरांनी यंत्रणांच्या साहाय्याने शुक्रवारी अवघ्या आठ तासांत रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविले होते.
आणखी वाचा-ठाण्याच्या काही भागात पाणीटंचाईचे संकट, मुंबई महापालिकेडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात ५ टक्के कपात
शनिवारी येथील फलाटाची रुंदी वाढविण्यात आली. तसेच उर्वरित तांत्रिक कामे करण्यात आली. ही कामे रविवारी दुपारी ३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी ७.३० वाजे पर्यंत सर्व कामे पूर्ण केली. रेल्वे रुळांवरून होणारी वाहतुक सुस्थितीत होईल का? याची चाचणी सकाळी ९.३० वाजता करण्यात आली. त्यासाठी एक रिकामी रेल्वेगाडी या रुळांवरून सोडण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा रेल्वे रुळ तपासले जाणार आहे. अभियंत्यांकडून पुन्हा एकदा सर्वेक्षण झाल्यानंतर येथून प्रवाशांची रेल्वेगाडी सोडली जाईल. त्यामुळे आज, प्रवाशांसाठी हा रेल्वे फलाट उपलब्ध होणार आहे.