उल्हासनगर: तृतीयपंथीयांसाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र वार्ड उभारण्याचा मान ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाला मिळाला असून हा स्वतंत्र वार्डचे शनिवारी सेवेत येतो आहे. अतिदक्षता विभागातील सुविधांसह स्वतंत्र बेडची व्यवस्था येथे करण्यात आली असून त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तृतीयपंथीयांना करावी लागणारी फरपट यामुळे थांबणार आहे. किन्नर अस्मिता संस्थेच्या सौजन्याने आणि सत्वा संस्थेच्या(SATTVA) कम्युनिटी लेड मॉनिटरिंग (CLM) या उपक्रमांतर्गत या स्वतंत्र वार्डची उभारणी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तृतीयपंथीयांना सर्वसामान्यप्रमाणे आयुष्य जगता यावे यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतलेला आहे. उल्हासनगर शहरात किन्नर अस्मिता संस्थेच्या माध्यमातून तृतीयपंथीयांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृहाची उभारणी करण्यात आली होती. सोबतच तृतीयपंथीयांना शासकीय पुरावे मिळावेत यासाठी शिबिरांचे आयोजनही केले जाते. तृतीयपंथीयांना कोणताही आजार उद्भवल्यास त्यांना रुग्णालयाची पायरी चढावी लागते. अशावेळी त्यांना कोणत्या वार्डमध्ये दाखल करावे असा प्रश्न असतो. त्यामुळे तृतीयपंथीयांची फरपट होते. अशात वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. ही गरज ओळखून उल्हासनगरच्या किन्नर अस्मिता संस्थेने तृतीयपंथीयांसाठी शासकीय रुग्णालयात स्वतंत्र वार्ड उभारावा या संकल्पनेवर काम सुरू केले.

आणखी वाचा-मोठागाव वळण रस्ता भूसंपादनाचे आव्हान कायम

सत्त्वा (SATTVA) संस्थेच्या सहकार्याने कम्युनिटी लेड मॉनिटरिंग (CLM) या उपक्रमांअंतर्गत उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली. नीता केणी, सिमरन सिंग यांनी त्यावर काम सुरू केले. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर रुग्णालयात चार स्वतंत्र बेडचे वार्ड तयार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. अखेर महाराष्ट्रातला तृतीयपंथीयांसाठीचा पहिला वार्ड उल्हासनगरमध्ये अस्तित्वात आला आहे. शनिवारी संस्थेचे सदस्य, पदाधिकारी आणि डॉ. मनोहर बनसोडे यांच्या उपस्थितीत हा वार्ड सेवेत येतो आहे. या वार्डमध्ये अतिदक्षता विभागात पुरवल्या जाणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तर स्वच्छतागृहांची व्यवस्थाही स्वतंत्रपणे करण्यात आल्याची माहिती सत्त्वा संस्थेचे प्रशांत रोठे यांनी दिली आहे. हा वार्ड तृतीयपंथीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे, अशी भावना यावेळी सर्व उपस्थित त्यांनी व्यक्त केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First time in maharashtra separate ward for trance gender care in the hospital mrj
Show comments