ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील तलावांमधील प्रदुषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबरोबरच तलाव सुशोभिकरण प्रकल्प प्रशासनाकडून राबविला जात असतानाच, महापालिका मुख्यालयापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर तलावातील हजारो माशांचा मृत्यु झाल्याचा प्रकार गुरूवारी उघडकीस आला.
तलावाच्या पाण्यावरील जलपर्णी तसेच काठावर मृत माशांचा खच्च पडलेला असून तलावातील प्रदुषणामुळे माशांचा मृत्यु झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान, परिसरातील सांडपाणी तलावात जात असल्यामुळे तलाव प्रदुषित होऊन ही घटना घडल्याचे पालिका प्रशासनानेही स्पष्ट केले आहे.
तलावांचे शहर म्हणून ठाणे शहराला ओळखले जाते. एकेकाळी शहरात ७५ हून अधिक तलाव होते. परंतु अतिक्रमणामुळे अनेक तलाव नामशेष पावले. शहरात सद्यस्थितीत ३५ तलाव आहेत. या तलावांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तलावांचा परिसर सुशोभित करण्याबरोबरच पाणी शुद्धीकरणांसाठी यंत्रे बसविण्यात येत आहेत. असे असले तरी आजही काही तलावातील पाणी प्रदुषण रोखण्यात पालिकेला यश आले नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
ठाणे महापालिकेच्या पाचपखाडी येथील मुख्यालय इमारतीपासून पाच मिनिटांच्या अंतरावर सिद्धेश्वर तलाव आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील असलेल्या या तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. या तलावाच्या पाण्यावर मोठ्याप्रमाणात जलपर्णी असून त्यावर मृत माशांचा खच्च पडल्याचे दिसून येत आहे. या प्रकारानंतर पालिकेच्या कारभारावर टिका होऊ लागली आहे.
प्रदुषणामुळे मृत्यु झाल्याचा आरोप
सिद्धेश्वर तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत असून, सातत्याने तलावातील प्रदूषणात वाढ होत आहे. तलावात ठिकठिकाणी जलपर्णी साचली आहे. या तलावाची निगा राखण्याचे काम कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मात्र, त्याच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. या संदर्भात महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे सातत्याने तक्रारी करूनही जलपर्णी काढली गेली नाही. त्यामुळे या तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाला, असा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी केला. तसेच या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र पाठवून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच तलावातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
प्रदुषण रोखण्यासाठी गटांची बांधणी सिद्धेश्वर तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. या भागात गटारे नसल्यामुळे तेथील सांडपाणी तलावात जाते. यामुळे तलावात जलपर्णीची वाढ होत असून ती सातत्याने काढली जाते. पण, सांडपाण्यामुळे ती पुन्हा येते. आताही जलपर्णी काढण्याचे काम सुरू होते. मात्र, प्रदुषित पाण्यामुळे माशांचा मृत्यु झाला आहे.
या तलावाच्या संवर्धनाचे काम करण्यात येणार असून त्याचा प्रस्तावही तयार केला आहे. तसेच परिसरातील सांडपाणी मिसळून तलावातील पाणी प्रदुषित होऊ नये यासाठी त्याठिकाणी सांडपाणी वाहू नेणारी गटारे बांधण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने दिली आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.