लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : तलावांचे ठाणे म्हणून ओळख असलेल्या शहरातील सिद्धेश्वर तलावात प्रदूषणामुळे मृत माशांचा खच पडला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून मृत माशांचे छायाचित्र पाठवून दिले. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप विचारे यांनी केला आहे.
विचारे म्हणाले की, वारंवार वृत्तपत्रातून येणारी कात्रण घेऊन २२ जानेवारीला ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत वस्तुस्थिती दाखविण्यात आली. त्यानंतर ७ फेब्रुवारीला ठाणे महापालिकेने गाळ काढण्याचे काम सुरू केले असे पत्राद्वारे कळवले. प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू केले नाही त्याचबरोबर ठाणे महापालिकेने या तलावाच्या संवर्धनासाठी राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत पाच कोटी ५० लाख रुपयांचा प्रस्ताव बनवून शासनाच्या मंजुरीनंतर सुरू करणार असे लेखी आश्वासन दिले होते.
प्रत्यक्षात कोणतेही काम त्या ठिकाणी सुरू झाले नसल्याने या तलावाला दुर्गंधी पसरली आहे. डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे . प्रदूषण विभागाच्या हलगर्जीपणामुळे या तलावातील मृत मासे तलावामध्ये तरंगले त्यानंतर प्रशासनाने मासे उचलण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून पडलेला गाळ ही तेथून उचलला जात नाही, असे विचारे म्हणाले. पावसाळा लक्षात घेऊन या तलावाभोवती मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे जर तलाव भरून झोपडपट्टी मध्ये पाणी शिरले तर याला सर्वस्वी आपण जबाबदार असाल असे त्यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.
शासनाने निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या घोषणा करून कामे सुरू केली. परंतु निधी अभावी आज शहरात अर्धवट स्थितीत कामे बंद पडली आहेत. ठाणे महापालिकेची परिस्थिती रसगळाला गेली असून शासनाच्या निधीवर महापालिकेस अवलंबून राहावे लागते. परंतु शहरात आवडत्या ठेकेदारांचे कामे सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध केला जातो असाही आरोप त्यांनी केला. हा पैसा जनतेचा आहे हा कोणी ठेकेदाराचा नाही ..कोणी मंत्र्यांचा पैसा नाही, तो विकास निधी सर्व ठिकाणी समभाव प्रमाणे वाटप झाला पाहिजे. कारण या जनतेनेच तुम्हाला निवडून दिलेल्या आहे असे मत राजन विचारे यांनी व्यक्त केले आहे.