शोभेसाठी घरात ठेवल्या जाणाऱ्या फुलदाणीसोबत आता अनेक ठिकाणी फिशटँकही दिसू लागले आहेत. फिश टँकमधील मासे घरात येणाऱ्या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतात. सुरुवातीला फिश टँकमध्ये अतिशय निवडक मासे होते. मात्र सध्या फिश टँकच्या लोकप्रियतेमुळे निरनिराळ्या माशांचे वास्तव्य फिश टँकमध्ये पाहायला मिळते. या माशांचा आकार, रंग यामुळे शोभिवंत मासे अशी त्यांची ओळख बनली आहे. प्रतिष्ठेचे साधन म्हणून हे फिश टँक घरोघरी पाहायला मिळतात. लोकप्रियता वाढत गेल्यावर शोभिवंत माशांच्या अनेक प्रजाती अस्तित्वात आल्या. मासेप्रेमींनी वेगवेगळे प्रयोग करून विविध माशांच्या प्रजाती बाजारात आणल्या. या माशांच्या प्रजातींपैकी सध्या लोकप्रिय असलेला मासा म्हणजे गोल्ड फिश.
शोभिवंत माशांच्या जातीमध्ये गणला जाणारा हा मासा बहुतेक घरातील फिश टँकमध्ये पाहायला मिळतो. गोडय़ा पाण्यातील हा गोल्ड मासा हजारो वर्षांपूर्वी चीन देशात आढळला. चीनमध्ये पूर्वी घराच्या बाहेर गोल्ड माशांसाठी स्वतंत्र टँक बनवण्यात येत असे. घरी पाहुणे येणार असतील तर त्या वेळी या माशांना घरात पॉण्डमध्ये आणून ठेवत. युरोपमध्ये पती लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी आपल्या पत्नीला गोल्ड मासा भेट म्हणून देत, अशी प्रथा होती. कालांतराने ही प्रथा बंद पडली. अठराव्या शतकात युरोपमध्ये आल्यावर या माशाला जगभरात लोकप्रियता प्राप्त झाली. भारतीय बाजारात गप्पी माशानंतर सर्वाधिक विकला जाणारा मासा अशी गोल्ड माशाची ओळख आहे. आकाराने मोठा झाल्यावर या माशाची विक्री होते. सुरुवातीला चेन्नई आणि कोलकाता या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात या माशांचे ब्रीडिंग होते. सोनेरी आणि चंदेरी गडद रंगात आढळणारे हे मासे कालांतराने बहुतेक रंगात आढळण्यास सुरुवात झाली.
वेगवेगळ्या प्रजाती
गोल्ड माशाची वाढ खूप जलद होते. याच कारणामुळे गोल्ड मासा समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या माशाची शेपटी, आकार, काही माशांच्या डोक्यावर असणारा गोलाकार घुमटासारखा आकार यामध्ये बदल होत या माशाच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. ब्लॅक टेलिस्कोप, बबल आय, कॉमेट, फॅनटेल, ओराण्डा, पॉम्पॉन, शुबनकिन, मॅटिअर गोल्ड फिश, पॅनासाबा, तोसाकिन, व्हाइट टेलिस्कोप अशा विविध प्रजाती गोल्ड माशांमध्ये लोकप्रिय आहेत.
लहान गोल्ड मासे पाच रुपये किमतीपासून बाजारात मिळत असून साधारण बाराशे किमतीपर्यंत मोठे मासे मिळतात. नाकापासून शेपटीपर्यंत माशांची लांबी मोजली जाते. सहा ते आठ इंचापर्यंत गोल्ड मासे वाढतात.
फिश टँकमध्ये सतत दंगा
गोल्ड मासे खेळकर आणि खोडकर असल्याने फिश टँकमध्ये या माशांची सतत हालचाल पाहायला मिळते. एका जागेवरून दुसऱ्या जागी ते सतत फिरत असतात. फिश टँकमध्ये झाडे ठेवली असतील तर आपल्या हालचालीने झाडे हलवणे, पाने कुरतडणे असा दंगा करण्यास या माशांना अधिक आवडते. फिश टँकमध्ये वाळू असल्यास गोल्ड मासे वाळूमध्ये स्वत:चे शरीर घुसवून वाळू उधळतात. यामुळे फिश टँकमधील स्वच्छ पाणी गढूळ होते. गोल्ड मासे असलेले फिश टँकमधील पाणी दर दोन दिवसांनी साफ करणे आवश्यक असते.
गोल्ड मासा खेळकर असला तरी इतर माशांना त्यामुळे धोका संभवत नाही. या माशासोबत इतर मासे ठेवता येऊ शकतात. इतर माशांना तो शांत बसू देत नाही इतकेच. मात्र गोल्ड माशापेक्षा आकाराने मोठे आणि रागीट मासे त्यांच्यासोबत ठेवू नयेत. कारण मोठे मासे गोल्ड माशांची शेपटी कुरतडण्याचा संभव असतो. शेपटी कुरतडलेले गोल्ड मासे कुरूप दिसायला लागतात. याशिवाय त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा