खाडी परिसरातील पर्यटकांसाठी ‘पक्षीदर्शन सफारी’ * नवीन व्यवसायातून चांगली आर्थिक कमाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानवी अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे गेल्या काही वर्षांपासून आक्रसत चाललेल्या मुंबई, ठाणे परिसरातील खाडय़ांमध्ये मासेमारी करणे दिवसेंदिवस कठीण बनत चालल्याने या पट्टय़ातील पारंपरिक कोळी समुदायातील अनेकांनी आता दुसऱ्या व्यवसायाकडे आपला मोर्चा वळवला आहे. खाडी परिसरातील पर्यटन, पक्षीदर्शन याकरिता येणाऱ्या हौशी पर्यटक, छायाचित्रकारांना हा परिसर आपल्या होडय़ा-बोटींतून फिरवून आणण्याच्या मोबदल्यात या मच्छीमारांना चांगला रोजगार मिळू लागला आहे. मासेटंचाईच्या काळात खाडी परिसरातील पक्षी या समुदायासाठी उदरनिर्वाहाचे नवीन साधन बनू पाहत आहे.

वनविभागाच्या खारफुटी संवर्धन उपक्रमांतर्गत खाडीकिनाऱ्याजवळ राहणाऱ्या कोळी बांधवांना बॉम्बे नॅचरल हिस्टरी ऑफ सोसायटीतर्फे पक्षी-निरीक्षणाचे प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण घेणाऱ्या कोळी बांधवांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ठाणे खाडी येथून सुरू झालेला हा उपक्रम लवकरच एलिफंटा तसेच रत्नागिरी या

भागांतही राबवण्यात येईल, अशी माहिती बॉम्बे नॅचरल हिस्टरी ऑफ सोसायटीच्या संचालिका निशिगंधा पेडणेकर यांनी दिली. नोव्हेंबर महिना सुरू होताच ठाणे खाडी परिसरात परदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन होत असते.

नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत फ्लेमिंगो तसेच अन्य परदेशी पक्षी ठाणे खाडी परिसरात वास्तव्यास असल्याने रंगीबेरंगी पक्ष्यांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पक्षीप्रेमी खाडीकिनारी गर्दी करतात. मात्र नव्याने पक्षी पाहण्यासाठी खाडीच्या ठिकाणी दाखल होत असलेल्या पक्षीप्रेमींना पक्ष्यांचे योग्य ठिकाणांची माहिती नसते. पक्षी-निरीक्षणासाठी ठाणे खाडीकिनारी दाखल होणाऱ्या पक्षीप्रेमींसाठी या परिसरात राहणारे कोळी बांधव गाईडच्या भूमिकेत शिरले आहेत.

ऐरोली ते भांडुप पक्ष्यांचे थवे

ऐरोली, दिघा, विटावा, भांडुप पम्पिंग स्टेशन परिसरातील खाडीकिनारी राहणारे कोळी या व्यवसायाकडे मोठय़ा प्रमाणावर वळले आहेत. यासाठी मासेमारी व्यावसायिकांना बॉम्बे नॅचरल हिस्टरी ऑफ सोसायटीतर्फे वेगवेगळे पक्षी कसे ओळखावे, पक्ष्यांचे नाव, रंग, सवयी, पक्षी-निरीक्षण करताना कोणती काळजी घ्यावी, पर्यटकांशी सुसंवाद कसा करावा याविषयी आठ दिवसांचे प्रशिक्षण दिले गेले आहे.

यासाठी पक्ष्यांची माहिती देणारी पुस्तिका तसेच प्रमाणपत्र देण्यात येते, असे पेडणेकर यांनी सांगितले. पक्षी-निरीक्षकांना, काही छायाचित्रकारांना पक्ष्यांची वैज्ञानिक माहिती असते. मात्र सामान्य नागरिकांना पक्ष्यांची ओळख नसते. त्यामुळे खाडीकिनारी राहणारे कोळी बांधव पर्यटकांसाठी माहीतगाराची भूमिका बजावत आहेत.

सरावाने कोळी बांधव पक्षी-निरीक्षणात अधिक तरबेज होतील, असे वन्यजीव छायाचित्रकार डॉ. सुधीर गायकवाड-इनामदार यांनी सांगितले.

‘मासेमारीपेक्षा पक्षीपर्यटन फायद्याचे’

थंडीच्या दिवसात खाडीतील मासे खोल तळाशी जात असल्याने मासेमारीसाठी हा हंगाम तुटवडय़ाचा असतो. खाडीच्या मध्यभागी २४ तास माशांच्या शोधात घालवले तरी पाचशे, हजार रुपयांचे उत्पन्न गाठीशी पडते. कधी तरी मासे न घेता परत यावे लागते. याउलट शनिवार आणि रविवारी पर्यटकांना खाडीच्या ठिकाणी पक्षी सफारीसाठी घेऊन गेल्यास दिवसाचे तीन ते चार हजार रुपये सुटतात, असे भांडुप पम्पिंग स्टेशनजवळ पक्षी-पर्यटनाचा व्यवसाय करणारे रुपेश कोळी यांनी सांगितले. दोन तास खाडी सफारी केल्यास प्रत्येकी पाचशे रुपये पर्यटकांकडून आकारण्यात येतात.

पक्षी-निरीक्षण करताना खाडीजवळच्या कांदळवन, खारफुटीला धोका पोहचू नये तसेच पक्षी-निरीक्षणासाठी आलेल्या पर्यटकांना उत्तम माहिती मिळावी, यासाठी खाडीकिनारी राहणाऱ्या स्थानिक कोळ्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे. या व्यवसायामुळे पर्यावरण संवर्धनात स्थानिक लोकांचा सहभाग वाढवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

– एन. वासुदेवन, मुख्य वनसंरक्षक, कांदळवन विभाग