मागील वर्षी एका व्यवहारात घेतलेली रक्कम खासगी सावकार परत करत नाही म्हणून, रेल्वेत तंत्रज्ञ असलेल्या एका कर्मचाऱ्याने डोंबिवलीतील खासगी सावकाराचे अपहरण केले. त्याला आपल्या मुंबईतील माटुंगा येथील घरात डांबुन ठेवले आणि त्यानंतर सावकाराच्या घरी त्याच्या पत्नीला संपर्क करून “पती हवा असेल तर पाच लाख रुपयांची खंडणी दे, त्याशिवाय पतीची सुटका करणार नाही.” अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पतीचा जीव धोक्यात आल्याने घाबरलेल्या पत्नीने खंडणीची रक्कम तडजोडीने देण्याची तयारी दाखविली. त्यानंतर टिळकनगर पोलिसांनी खंडणीची रक्कम डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये स्वीकारण्यासाठी आलेल्या रेल्वे तंत्रज्ञाला अटक केली.

पोलिसांनी सांगितले, “अतुल व्यापारी (५६) हे ग्राहकांना बँकेतून कर्ज मंजूर करून देण्यासाठी मार्गदर्शन आणि मंजुरीसाठी सहकार्य करतात, व्याजाने पैसे देण्याची कामे करतात. आरोपी अजय पांडुरंग जाधव (५२, रा. अबॉव्ह रेल्वे पॉली दवाखाना, सेंन्ट्रल रेल्वे स्टाफ क्वार्टर, माटुंगा) हा रेल्वे मध्ये तंत्रज्ञ म्हणून नोकरीला आहे. एका व्यवहारामध्ये रेल्वे तंत्रज्ञ अजय जाधव याने अतुल व्यापारीला दोन लाख ८० हजार रुपये काही अटींवर दिले होते. मात्र एक वर्ष उलटले तरी दिलेल्या शब्दाप्रमाणे अतुल व्यापारी पैसे करत नसल्याने अजय जाधव संतप्त झाला होता. यावरुन दोघांच्यात वाद सुरू होते. अजयने अतुलला पैसे कधी परत करणार याविषयी चर्चा करण्यासाठी गेल्या आठवड्यात डोंबिवलीत बोलविले होते. या भेटीच्या वेळी अजय आणि अतुल यांच्यात भांडण झाले व अजयने अतुलला मारहाण केली. यानंतर अतुलला आपल्या सोबत घेऊन माटुंगा येथील रेल्वे वसाहतीमधील घरात आठ दिवस डांबून ठेवले.

आरोपीने पाच लाख रुपयांची केली मागणी –

पती घरी येत नसल्याने अतुलची पत्नी घाबरली, शिवाय त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे अतुल यांची पत्नी ऋचा यांनी टिळनकगर पोलीस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता असल्याची तक्रार केली. टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी तत्काळ तपास पथक तयार करून अतुल व्यापारी यांचा शोध सुरू केला. हा तपास सुरू असताना अजय जाधवने अतुलची पत्नी ऋचा यांना संपर्क करून “पती हवा असेल तर पाच लाखाची खंडणी दे” अशी मागणी केली. मात्र एवढी रक्कम तातडीने देणे शक्य नसल्याचे ऋचाने अजयला सांगितले आणि तीन लाख रुपये देण्याची तयारी ऋचाने दाखविली. यानंतर खंडणीसाठी पतीचे अपहरण झाल्याची माहिती ऋचाने वरिष्ठ निरीक्षक आफळे यांना दिली व अपहरण करणारा पाच लाखाची खंडणी मागत असल्याचे सांगितले.

… आणि हॉटेलमध्ये साध्या वेशात बसलेल्या पोलिसांनी आरोपीला पकडले –

पोलिसांनी अजयला सापळ्यात अडकविण्याची व्यूहरचना आखली. पोलिसांनी ऋचा व्यापारीला सांगितले की, अजय जाधवला तुम्ही पाच लाखाची खंडणी देण्याची तयारी दाखवून ती रक्कम स्वीकारण्यासाठी डोंबिवलीत बोलवा. त्याप्रमाणे ऋचाने अजयला निरोप दिला. अजय जाधव अतुलला घेऊन डोंबिवलीतील फडके रोडवरील एका हॉटेलमध्ये खंडणीची रक्कम ऋचाकडून स्वीकारण्यासाठी रविवारी आला. या हॉटेलमध्ये पोलिसांनी अगोदरच सापळा लावून ठेवला होता. अजय, अतुल आणि ऋचा एका टेबलजवळ बसताच, खंडणीच्या रकमेवरून चर्चा आणि देवघेव सुरू असताना ऋचाने पोलिसांना इशारा केला. तत्काळ हॉटेलमध्ये साध्या वेशात बसलेल्या पोलिसांनी अजय जाधववर झडप घालून त्याला अटक केली आणि अतुल व्यापाऱीची त्याच्या तावडीतून सुटका केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अजयला बुधवारपर्यंत पोलीस कठोडीत ठेवण्याचे आदेश कल्याण न्यायालयाने दिले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five lakhs demand of a railway technician to the wife of a moneylender in dombivli msr
Show comments