डोंबिवली: काटई-बदलापूर रस्त्यावरील कोळेगाव जवळील नाल्यात सोमवारी सायंकाळी एक ओला कार नाल्यात पडली. कारमधील पाच प्रवासी जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरिकांनी जवळील रुग्णालयात दाखल केले.
शिळफाटा रस्त्याने काटई-बदलापूर रस्त्याला जाण्यासाठी कोळेगावातून एक मधला मार्ग आहे. या रस्त्याच्याकडेला एक अरुंद नाला आहे. सोमवारी सायंकाळी एक ओला कार चालक पाच प्रवाशांना घेऊन जात होता. अरुंद रस्ता आणि बाजुला कठडा नसलेला नाला असल्याने चालकाने काळजी घेऊन वाहन चालविणे आवश्यक होते. परंतु चालक कार वेगाने चालवित होता. त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट जवळच्या नाल्यात पडली. त्यावेळी या भागातून माजी नगरसेवक महेश पाटील तेथून जात होते. त्यांनी तात्काळ आपले वाहन थांबविले. स्वत:सह सहकारी नाल्यात उतरले. त्यांनी मोटारमधील पाच प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
हेही वाचा… कल्याणच्या स्कायवाॅकवर निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला लुटले
अचानक कार कोसळल्याने मोटारमधील ज्येष्ठ नागरिक असलेले पाचही प्रवासी जखमी झाले. त्यांना पाटील यांनी आपल्या मोटारीतून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. नाल्यातून मोटारीला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला होता.