ठाणे : शेअर बाजारात जादा परतावा मिळवून देतो अशी बतावणी करून पाच जणांची ६० लाख रुपयांना फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यातील मुख्य तक्रारदार हा कोलशेत भागात राहतो. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याला व्हाॅट्सॲप क्रमांकावर एक संदेश प्राप्त झाला होता. त्या संदेशामध्ये एक ॲपचे लिंक देण्यात आले होते. त्यांनी लिंकवर क्लिक करून ते ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये सामाविष्ठ केले. काही दिवसांनी त्यांना एका व्यक्तीने व्हाॅट्सॲपवर संदेश पाठवून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याबाबत माहिती दिली. चांगला परतावा मिळत असल्याने त्यांनी या ॲपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. त्यांच्यासोबत त्यांच्या मित्राने देखील यात पैसे गुंतविले.
अशाप्रकारे दोघांनी मिळून २१ लाख २० हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात पाठविले. परंतु परतावा काढताना त्यांना ते ॲप बंद असल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी सरकारच्या एनसीसीआरपी संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फसवणूक झालेले व्यक्ती, त्यांचा मित्र आणि आणखी तीन जणांची अशाचप्रकारे ऑनलाईन फसवणूक झाली असल्याचे समोर आले. त्यानुसार, वेगवेगळ्या प्रकरणात एकत्रितरित्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.