कल्याण – कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा आणि गोदरेज हिल भागात बेकायदा बांधकाम करणाऱ्या दोन वेगळ्या बेकायदा बांधकामांमधील एकूण पाच जणांंवर कल्याण डोंबिवली पालिकेच्या ब प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाने (एमआरटीपी) फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या ब प्रभागाचे अधीक्षक भूषण कोकणे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की गोदरेज हिल भागात पटेल आर मार्ट जवळ मोकळ्या जागेत जयराम गणेशा पटेल यांनी एका पत्र्याच्या निवाऱ्याचे बेकायदा बांधकाम केले असल्याची तक्रार कल्याणमधील माहिती कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी पालिकेत केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने जयराम पटेल यांना बांधकामाची अधिकृतता सिध्द करणारी कागदपत्रे पालिकेत सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. ते सुनावणीला हजर राहिले. जमीन मालकी हक्काची कागदपत्रे त्यांनी सादर केली. परंतु, बांधकामाची अधिकृतता सिध्द करणारी, पालिकेकडून देण्यात येणाऱ्या बांधकाम परवानगीची कागदपत्रे ते सादर करू शकले नाहीत. त्यामुळे पटेल यांचे बांधकाम अनधिकृत घोषित करून ते स्वताहून तोडून घेण्याचे बजावण्यात आले होते. पटेल यांनी निवाऱ्याचे बांधकाम स्वताहून तोडून घेतले नाही. अखेर पालिकेच्या ब प्रभागाच्या तोडकाम पथकाने ते बेकायदा बांधकाम तोडून टाकले. त्यानंतरही तोडलेले बांधकाम पटेल यांनी तीन वेळा पुन्हा उभारल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. एकच चूक पटेल सतत करत असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम आणि एमआरटीपीचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
दुसऱ्या एका प्रकरणात, मौजे गौरीपाडा योगीधाम भागात एकनाथ भोईर-मानेरकर, गोपीनाथ भोईर, प्रल्हाद भोईर, अशोक भोईर यांनी बेकायदा चाळींचे बांधकाम केले आहे, अशी तक्रार माहिती कार्यकर्ते इंद्रमणी उपाध्याय यांनी पालिकेच्या ब प्रभागात केली होती. ब प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीवरून बांधकामधारकांना बांधकामाची अधिकृतता सिध्द करणारी कागदपत्रे दाखल करण्याची नोटीस बजावली. बांधकामधारकांनी जमिनीची कागदपत्रे सादर केली. पण चाळीच्या बांधकामाची अधिकृतता सिध्द करणारी, पालिकेच्या बांधकाम परवानगीची कागदपत्रे ते पालिकेत सादर करू शकले नाही. त्यामुळे त्यांचे बांधकाम अनधिकृत घोषित करून ते स्वताहून तोडून टाकण्याची नोटीस बांधकामधारकांना बजावण्यात आली. तरीही बांधकामधारकांनी ते बांधकाम स्वताहून काढून घेतले नाही. याऊलट पालिका अधिकाऱ्यांना त्या चाळींमध्ये रहिवास आढळून आला. चाळ रहिवास मुक्त करण्याची नोटीस बांधकामधारकांना बजावण्यात आली आहे.
बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी अधीक्षक भूषण कोकणे यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांच्या निर्देशावरून बांधकामधारकांविरुध्द एमआरटीपीची तक्रार दाखल केली. खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. बेकायदा बांधकामे करणाऱ्यांच्या विरुध्द एमआरटीपीचे गुन्हे दाखल करा, असे आदेश आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी दिल्याने प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी अशाप्रकारचे गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू केली आहे.