लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : वारंवार नोटिसा देऊनही मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या येथील ग प्रभाग हद्दीतील वाणीज्य वापर असलेल्या पाच आस्थापना ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी सील केल्या. या मालमत्ताधारकांकडे एकूण १६ लाख ५४ हजार ९७७ रूपयांची थकबाकी आहे.
पाच गाळे सील करण्यात आलेल्या थकबाकीदारांच्या यादीत डोंबिवली पूर्वेतील नांदिवली रोडवरील गोविंद राजाराम पाटील यांच्या राजाराम निवासमधील पाच दुकान गाळ्यांचा समावेश आहे. या गाळ्यांचे मालक असलेल्या गोविंद पाटील यांच्याकडे मालमत्ता कराची ११ लाख ३७ हजार २३४ रूपयांची थकबाकी आहे. त्यांना ही थकित रक्कम भरणा करण्यासाठी पालिकेने वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. त्यांच्याकडून ही रक्कम भरणा न करण्यात आल्याने त्यांचे व्यापारी गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली, अशी माहिती ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी दिली.
आणखी वाचा-नवनियुक्त पोलीस कर्मचारी रिक्षात विसरला महत्त्वाची कागदपत्र आणि गणवेश
मानपाडा रस्त्यावरील लक्ष्मी निवास येथील क्रिटीकल केअर सेंटर यांचीही पालिकेकडे मालमत्ता कराची सात लाख १६ हजार ७४३ इतक रक्कम थकित होती. त्यांनाही पालिकेने वारंवार नोटिसा पाठवून कर भरणा करण्याची ताकीद दिली होती. त्यांनी ही रक्कम वेळेत भरणा केली नाही. त्यामुळे त्यांचे क्रिटीकल केअर सेंटर सील करण्यात आले, असे साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी सांगितले. पालिकेच्या जनसंपर्क विभागाने प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात आस्थापना सील करण्याच्या कारवाईची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, मालमत्ता कर उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त कुमावत, अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे, वरिष्ठ लिपिक नरेश म्हात्रे, लिपिक रामचंद्र दळवी, गोविंद पोटे, मोहम्मद खान यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.
आणखी वाचा-‘रंगसंवाद’मधून युवा नाट्यकर्मींना अभिनयाचे धडे
गेल्या दोन महिन्याच्या काळात पालिकेचा कर्मचारी वर्ग विधानसभा निवडणूक कामात व्यस्त होता. या कालावधीत मालमत्ता कराची अपेक्षित वसुली पालिकेला करता आली नाही. येत्या चार महिन्यावर पालिकेचा अर्थसंकल्प येऊन ठेपला आहे. मालमत्ता कराचा लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी मालमत्ता कर विभागाला आता धावपळ करावी लागणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका संपताच प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. जे मालमत्ता कर थकबाकीदार आहेत त्यांच्या मालमत्ता सील करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे.
ग प्रभाग हद्दीत काही मालमत्ताधारकांकडे कराची थकबाकी आहे. अशा धारकांना वारंवार नोटिसा देऊनही ते कर भरणा करत नाहीत. त्यामुळे अशा मालमत्ताकरधारकांच्या मालमत्ता सील करण्याची मोहीम आयुक्त डॉ. जाखड, उपायुक्त देशपांडे यांच्या आदेशावरून सुरू केली आहे. ग प्रभाग हद्दीतील एकूण सहा आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. -संजयकुमार कुमावत, साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली.