कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बारावीच्या परीक्षा केंद्रांवरील काॅपीचे प्रकार रोखण्यासाठी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशावरून शिक्षण विभागाने पाच विशेष भरारी पथके स्थापन केली आहेत. ही पथके अचानक कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कोणत्याही बारावीच्या परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थी परीक्षा देत असलेल्या वर्ग खोल्यांमध्ये तपासणी करणार आहेत.पालिका शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्या नियंत्रणाखाली ही पथके काम करणार आहेत. यामधील तीन पथके बैठे पध्दतीने काम करणार आहेत. तर दोन पथकाने विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्षा केंद्रातील वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थी काॅपीमुक्त पध्दतीने उत्तरपत्रिका लिहितात ना याची तपासणी करणार आहेत.
पालिका हद्दीतील बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात. एकाही केंद्रावर काॅपीचा प्रकार होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने ही विशेष खबरदारी घेतली आहे. मागील काही वर्षात कल्याण, डोंबिवलीतील ज्या शाळांमध्ये परीक्षेच्या काळात काॅपीचे अधिक प्रकार घडतात. अशा शाळांची माहिती काढून त्या शाळांमधील परीक्षा केंद्रावर कायमस्वरुपी बैठी पथके तैनात असणार आहेत.पालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकार विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक बारावीचा पेपर सुरू झाला की शहरातील विविध केंद्रांना अचानक भेटी देणार आहे. ज्या शाळेत विद्यार्थी काॅपी करत असल्याचे निदर्शनास आले तर तेथील परीक्षा केंद्र चालक, पर्यवेक्षक यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील बारावीच्या एकाही परीक्षा केंद्रावर काॅपीचा प्रकार होता कामा नये. प्रत्येक परीक्षार्थी विद्यार्थ्याला मोकळ्या मनाने उत्तरपत्रिका लिहिता यावी या विचारातून आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी भरारी पथके स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात. कोणत्याही परीक्षा केंद्रावर काॅपीचा प्रकार घडू नये. या उद्देशातून आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या संकल्पनेतून पालिकेने भरारी पथके स्थापन केली आहेत. बारावी परीक्षेच्या वेळेत ही पाचही पथके पूर्णवेळ सक्रिय असणार आहेत.- संजय जाधव, उपायुक्त,शिक्षण विभाग.