रणरणत्या उन्हाने अंगाची काहिली होत असतानाच सोमवारी दिवसभर सुरू राहिलेल्या विजेच्या लपंडावाने ठाणेकरांना अक्षरश: घाम फोडला. अवघ्या शहरात सकाळी अकरापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाच वेळा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना भरदुपारी उकाडय़ाला तोंड द्यावे लागले.   
ठाण्यातील नौपाडा परिसरातील गोखले रोडवर सोमवारी वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू होता. सकाळी ११ वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित झाला होता. प्रत्येक वेळी १० ते १५ मिनिटांच्या वेळात वीजपुरवठा पुन्हा सुरळीत होत होता. मात्र यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. नौपाडा परिसर ठाण्यातील मध्यवर्ती आणि व्यापारीदृष्टय़ा महत्त्वाचे स्थान असलेला परिसर आहे. त्यामुळे या भागात विजेची सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असते, असे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.  
उन्हाळ्यात जास्तीचा वापर, पावसाळ्यात वादळामुळे आणि विजेच्या कडकडाटामुळे वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे यावर काही तरी कायमस्वरूपी तोडगा निघावा, अशी अपेक्षा नौपाडय़ातील अर्णव आपटे यांनी व्यक्त केली.