वाहनतळ, रस्ते, पदपथ, स्वच्छतागृह आदी सुविधा पुरवण्यासाठी पंचवार्षिक आराखडा
ठाण्यापुढील विशेषत: कल्याण, डोंबिवली परिसरातील रेल्वे स्थानकांतील गैरसोयी आणि दुरवस्था याकडे यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातही दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका होत असतानाच कल्याण, डोंबिवली महापालिकेनेच आता या रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार केला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या नऊ रेल्वे स्थानकांतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचा रेल्वे पकडण्याआधीचा व नंतरचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी या ठिकाणी सुसज्ज वाहनतळ, ऐसपैस रस्ते, पदपथ, स्वच्छतागृहे, परिवहन उपक्रमांचे बसथांबे, रिक्षाथांबे, वाहतूक बेट, तापमानदर्शक फलक उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालिका प्रशासनाने आखला आहे. यासाठीचा पंचवार्षिक आराखडा तयार करण्यात आला असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
कल्याण, डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत टिटवाळा, आंबिवली, शहाड, विठ्ठलवाडी, कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, निळजे ही नऊ रेल्वे स्थानके येतात. यापैकी कल्याण आणि डोंबिवली ही मोठी व महत्त्वाची स्थानके वगळता अन्य स्थानकांत प्रवाशांच्या वाटय़ाला गैरसोयीच अधिक येतात. त्यातच रेल्वेस्थानकातून तावून, सुलाखून निघालेल्या प्रवाशांना स्थानकाबाहेरही असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. या पाश्र्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी या रेल्वे स्थानकांचा परिसर सुविधांनी सज्ज करण्याचा आराखडा केला असून पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनीही त्याच्या अंमलबजावणीस हिरवा कंदील दाखवला आहे.
रेल्वे स्थानक परिसराचा विकास करावयाचा असेल तर, रेल्वे स्थानक परिसरातील बेकायदा टपऱ्या, रस्त्यावर अतिक्रमण करून उभारलेल्या इमारती, त्यांची वाढीव बांधकामे जमीनदोस्त करणे आवश्यक आहे. तसेच, फेरीवाल्यांना रेल्वे स्थानक परिसरातून कायमचे दूर करणे गरजेचे असल्याने, आयुक्त रवींद्रन यांनी या अत्यावश्यक कामांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. पालिकेने रेल्वेच्या सहकार्याने अलिकडेच कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील कामांचा शुभारंभही केला आहे. डोंबिवली, विठ्ठलवाडी, टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरातील बेकायदा टपऱ्या प्रशासनाने तोडून टाकल्या आहेत
आराखडय़ाची वैशिष्टय़े
- सार्वजनिक स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य
- ठिकठिकाणी कचराकुंडय़ा
- सार्वजनिक वाहनतळाची सुविधा
- रिक्षांसाठी स्वतंत्र वाहनतळ
- फेरीवालामुक्त रस्ते, पदपथ
- तापमानदर्शक फलक
कल्याण, डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत टिटवाळा, आंबिवली, शहाड, विठ्ठलवाडी, कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, निळजे ही नऊ रेल्वे स्थानके येतात.
दररोज १० लाख प्रवासी पालिका हद्दीतील रेल्वे स्थानकांवरून प्रवास करतात. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सामान्यांना दीर्घकालीन नागरी सुविधा मिळण्याच्या विचारातून हा विकासाचा आराखडा तयार करण्यात
आला आहे. पालिकेची सर्वसाधारण सभा, प्रशासकीय मान्यतेनंतर, उपलब्ध निधी, शासनाकडून या कामांसाठी मिळणारे साहाय्य या सर्व बाबी तपासून टप्प्याटप्प्याने या आराखडय़ाची अंमलबजावणी करण्यात येईल.
– संजय घरत, अतिरिक्त आयुक्त , कडोंमपा