डोंबिवली – कल्याण- शिळफाटा रस्त्यावरील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या पलावा वसाहतीमधील एका बंद सदनिकेत डांबून ठेवण्यात आलेल्या विविध प्रकारच्या प्रतिबंधित वन्यजिवांची ठाणे वन विभाग, मानपाडा पोलीस, विशेष पोलीस दलाने केलेल्या कारवाईत शनिवारी सुटका केली. या वन्यजिवांना डांबून ठेवणारी व्यक्ती मात्र सदनिका बंद असल्याने वन विभागाच्या हाती लागली नाही. तिचा शोध वन विभाग, पोलिसांनी सुरू केला आहे.
सुटका करण्यात आलेल्या वन्यजिवांमध्ये साप, कासव, सरडा, चिंपाझी जातीची माकडे, अजगर यांचा समावेश आहे. पलावा वसाहतीमधील एक्सपेरीया व्यापारी संकुलाजवळील सवरना इमारतीच्या बी विंगमधील आठव्या माळ्यावरील ८०६ क्रमांकाच्या सदनिकेत डांबून ठेवलेले वन्यजीव आढळून आले. सवरना इमारतीमधील सोसायटीमधील रहिवाशांना काही दिवसांपासून खोली क्रमांक ८०६ मध्ये संशयास्पद हालचाली होत असल्याचे निदर्शनास आले होते. काही दिवसांपासून ती सदनिका बंद होती आणि या सदनिकेतून दुर्गंधी येण्यास सुरूवात झाली होती.
हेही वाचा – ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले
याप्रकरणाची माहिती जागरूक रहिवाशांनी मानपाडा पोलीस, तेथून वन विभागाला देण्यात आली. वन विभागाने आपला सापळा यशस्वी व्हावा अशी व्यूहरचना आखली. ठाणे जिल्ह्याचे उपवनसंरक्षक सचिन रेपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक वनसंरक्षक सोनल वळवी, विभागीय वनाधिकारी राजू शिंदे, वनपाल, वन संंरक्षक रोहित भोई, लोहकरे, सावंत, रिंगणे आणि राज्य राखीव पोलीस दलाचे पथक यांनी संयुक्तपणे सवरना इमारतीमधील वन्यजीव डांबून ठेवलेली सदनिका कौशल्याने उघडली.
पथकाने सदनिकेची तपासणी सुरू करताच त्यांना घरातील खोल्यांमध्ये लोखंडी जाळ्यांमध्ये बंदिस्त स्वरुपात डांबून ठेवलेले विविध प्रजातीचे प्रतिबंधित वन्यजीव आढळले. उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेला हा प्रकार पाहून तपासणी पथक हैराण झाले. अनेक दिवसांपासून सदनिका बंद असल्याने खोलीत दुर्गंधी सुटली होती. सदनिका उघडल्यानंतर या सदनिकेचा ताबेदार किंवा वन्यजिवांची उलाढाल करणारा काळजीवाहक पुढे आला नाही. अनेक दिवसांपासून हे वन्यजीव बंदिस्त असावेत. ते अन्यपाण्याविना भुकेले असावेत, असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पथकाने वन्यजीव संरक्षण कायद्याने वन्यजीव जप्त केले. या वन्यजिवांची देखरेख, पोषण करण्यासाठी काही दिवस हे वन्यजीव कल्याणमधील बिरसा मुंडा या स्वयंसेवी संस्थेकडे वन विभागाने सुपूर्द केले.
हे प्राणी सोसायटीमध्ये आणले कोणी. या प्राण्यांचा ते काय उपयोग करणार होते. या खोलीचा मालक कोण, या प्राण्यांची तस्करी करण्याच्या उद्देशाने हे प्राणी या खोलीत आणून ठेवले होते का. ते या खोलीपर्यंत कसे आणि कोठून आणले गेले, अशा अनेक माध्यमातून वन विभाग, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात यासंदर्भातची माहिती देण्यात आली आहे.