गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारपासूनच ठाणे, डोंबिवलीतील बाजारांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. ठाण्यातील गोखले रोड, राम मारुती मार्ग, घंटाळी, स्थानक परिसरात विक्रेत्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. आकर्षक सजावटीसोंबतच गणरायासाठी आकर्षक दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडू लागली आहे.
यावर्षी गणेशोत्सवासाठी बाजारात नवीन नक्षीकाम केलेले कंठी, शेला, मोदक, मुकूट आणि सोंडपट्टा असे एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसोबत मोती आणि हिऱ्यांनी जडविलेले दागिने उपलब्ध झाले आहेत. गौरीसाठी मंगळसूत्र, बांगडय़ा, हार, बाजूबंद, कमरपट्टा आणि नथ असे दागिने बाजारात विवीध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. यंदा सोन्याचे भाव वधारल्याने ग्राहकांचा कल एक ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी करण्याकडे आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या काळात घरगुती गणपतीला मखरांच्या सजावटीसोबत दागिन्यांनीही सजवले जाते. त्यामध्ये कंठी, मुकूट, शेला, सोंडपट्टा, भिकबाळी या दागिन्यांचा वापर केला जात असतो. काही वर्षांंपूर्वी फक्त मोदककंठी हा पर्याय उपलब्ध होता. मात्र, यावर्षी कंठीमध्ये अनेक प्रकार बाजारात विक्रीसाठी आले आहेत. यामध्ये चंदनकंठी, दगडूशेठ कंठी आणि फुलकंठी असे प्रकार कंठीमध्ये विक्रीसाठी आले आहेत. या कंठय़ा १ हजार रुपये किमतीपासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर, गणपतीच्या मुकुटांमध्ये सूर्यमुकूट, मोर मुकूट आणि फुलमुकूट अशा विविध प्रकारच्या मुकुटांना यंदा मागणी असल्याचे पहायला मिळत आहे. या मुकुटांची किंमत ५०० रुपयांपासून ते ३००० रुपयांपर्यंत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
गणपतीसाठी लागणारा शेला मापानुसार ७०० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच गणपतीला एक ग्रॅम सोन्याचा पाय आणि हातही यावेळेस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सोन्याचे हात आणि पायांची किंमत १ हजार पासून ते ३ हजापर्यंत आहे. डायमंड मोदकला बाजारात मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. या डायमंड मोदकमध्ये दोन माप असून याची किंमत एक हजार ते १५०० अशी आहे. तर, यावेळेस मुशकमध्यही नवीन प्रकार आहेत. यामध्ये फायबर मुशक, गजमुखा मुशक आणि वीणा गोल्ड मुशक आहेत, असे सुधीर कदम या विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
दरवर्षी गणपती उत्सवादरम्यान दागिन्यांमध्ये नविन नक्षीकाम करून दागिने विक्रीसाठी उपलब्ध करत असतो. यंदाही कंठी, मुकूट, आणि मोदक हे नविन नक्षीकाम केलेले गणपतीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ग्राहकांची देखील हे दागिने खरेदी करण्यासाठी पसंती दिसून येत आहे.
– हितेश पटेल, सोने विक्रेते,ठाणे