कल्पेश भोईर

वसईतील पूर संकट आता दूर होण्याऐवजी दिवसेंदिवस अधिक भीषण होऊ लागले आहे. वसईच्या अनियंत्रित आणि बेसुमार अनधिकृत बांधकामांनी वसईवर संकट येणार असल्याची चाहूल दिली होती. ही भीती खरी ठरू लागली आहे. हे मानवनिर्मित जलसंकट एवढे भीषण आहे की, आता वसईत का राहायचं, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यंदाच्या पावसाळ्यातही वसई विरार शहरात पूर येऊन शहर जलमय झाल्याने पुराचे संकट वसईकरांवर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेने विविध दावे करुन उपाययोजना केलेल्या असल्या तरी वसईत यापुढेही भीषण पूर आणि त्याअनुषंगाने विविध समस्यांची संकटे येत राहणार हे निश्चित झाले आहे. वसई विरार शहरात मागील वर्षांपासून पूरस्थिती निर्माण होण्यास सुरवात झाली आहे.  शहर नियोजनाचा असलेला अभाव, बेकायदेशीर बांधकामे, नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे यामुळे वसईकर नागरिक पूरसंकटात सापडू लागले आहेत. पावसाची सुरवात होताच वसईचा बहुतांश भाग पाण्याखाली जाऊ  लागला आहे. यामुळे या भागातील सातत्याने जनजीवन विस्कळीत होऊ  लागले असल्याने नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले आहेत. अशी पूरस्थिती वसईच्या जनतेने याआधी कधी अनुभवली नव्हती, परंतु आता मागील दोन वर्षांपासून निर्माण होत असलेली पूरस्थिती प्रत्येक वसईकर नागरिकाला विचार करायला लावणारी आहे. यामागची कारणेही तशीच आहेत. शहर जरी विकासाच्या दृष्टीने विकसित होत आहे असे जरी वाटत असले, तरी वास्तव काही वेगळेच आहे.

वसई विरार शहरात मागील काही वर्षांपासून अनियंत्रित नागरिकीकरण सुरू झाले होते. दररोज शेकडो अनधिकृत बांधकामे उभी राहत होती. ती अनधिकृत असल्याने नियमांचे कुठलेही बंधन नव्हते. वनजमिनी, नैसर्गिक पाणथळे, तिवरांच्या कत्तली, मातीभराव करून बांधकामे केली जात होती. हा प्रकार संकटाची चाहूल देत होता. त्याची फळे मागील दोन वर्षांपासून मिळू लागली आहेत. मागील दोन वर्षांपासून वसईच्या भागात पूर संकट निर्माण होऊ  लागले आहे. यामुळे वसई शहराला पुराने वेढा बसू लागला आहे. यामध्ये वीजपुरवठा खंडित होणे, संपर्काची सर्व साधने कोलमडून पडू लागली आहेत, मालमत्तांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊ  लागले, शाळा महाविद्यालये बंद पडून शालेय मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ  लागले आहे, वाहतूक सेवा ठप्प होऊ  लागली आहे. औद्योगिक वसाहती बंद पडून कामगारांच्या रोजगारावर परिणाम अशा असंख्य समस्या यामुळे निर्माण होऊ  लागल्या आहेत. मागील वर्षी जुलै २०१८ मध्ये वसई विरार भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. कधी अशा प्रकारची पूरस्थिती वसईच्या जनतेने पहिली नव्हती. अशा प्रकारची पूरस्थिती नंतर शहरात पुन्हा निर्माण होऊ  नये यासाठी पालिकेच्यावतीने उपाययोजना करण्यासाठी जनसुनावणी घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर निरी व आयआयटीसारख्या नामांकित संस्थांची सत्यशोधन समित्यांची स्थापना करण्यात आली.  त्यानुसार शहरातील नालेसफाई व त्यांनी दिलेल्या अहवालानुसार उपाययोजना करण्यात आल्या असल्याचा दावा पालिकेच्या वतीने करण्यात आला. दावा जरी खरा असला तरी वसईवरील पूरसंकट सरता सरेना अशी स्थिती सध्याची आहे. शहराची वाढती लोकसंख्या त्याचबरोबर शहरात वाढणारे अनधिकृत बांधकाम, बेसुमार माती भराव यामुळे पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग पूर्णपणे बंद होऊ  लागले आहेत. खाडय़ांचे जरी खोलीकरण व रुंदीकरण झाले असले, तरी त्या खाडय़ांच्या पात्रापर्यंत पोहचणारे मार्ग सुरळीत असणे आवश्यक आहे. मात्र त्या मार्गातच बेकायदा माती भराव, अनधिकृत बांधकाम झाले असल्याने पाणी जाणार कुठून असा सवाल निर्माण झाला आहे.

हे रोखण्यासाठी महापालिका व महसूल विभाग हा सपशेल अपयशी ठरत आहे. यामुळे मागील वर्षांप्रमाणे यंदाही जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस होऊन सलग तीन वेळा वसईच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली. यामध्ये किनारपट्टीवर असलेले अर्नाळा खाडीपाडा, खारभूमी वस्ती, पाणजू बेट, मालजीपाडा, यासह वसईतील सनसिटी, एव्हरशाईन परिसर, वसंतनगरी, नालासोपारा पूर्व, गालानगर, टाकीरोड, सेन्ट्रल पार्क, आचोळे रोड, विरार पश्चिमेतील परिसर, खानिवडे यासह विविध भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. याचा फटका या भागात राहणाऱ्या नागरिकांना बसला आहे. यामुळे विविध गावांचा शहराशी संपर्क तुटला. तर काही भागातील घरामध्ये पाणी घुसून मोठय़ा प्रमाणात मालमत्तांचे नुकसान झाले आहे. तर समुद्राला भरती असल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी अडथळे निर्माण होत असल्याने वसईच्या सखल भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचून राहिले. या साचलेल्या पाण्यातूनच नागरिकांना प्रवास करावा लागाला. वसई विरार भागात पूरस्थिती निर्माण होण्याचे प्रमाण आता वाढू लागल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. महिनाभराच्या कालवधीमध्ये तिसऱ्यांदा या पूरस्थितीला सामोरे जावे लागले, त्याचा

परिणाम या भागातील नागरीवस्तीवर झाल्याचे दिसून आले आहे. अशी पूरस्थिती सातत्याने निर्माण होत असल्याने वसईत का राहायचं, वसईत घरे का विकत घ्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.