बदलापूर : गुरूवारी रौद्र रूप धारण करणाऱ्या उल्हास नदीची पाणी पातळीत शुक्रवारी घट दिसून आली. उल्हास नदीची पाणी पातळी सकाळी १४.७० मीटर इतकी होती. त्यामुळे बदलापूर शहरावरचे पूर संकट टळले आहे. गुरुवारी उल्हास नदी आहे १८.८० मीटर इतकी सर्वोच्च पाणी पातळी गाठली होती. त्यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर रायते येथील पुलावर पाणी साचल्याने गुरुवारी वाहतूक ठप्प होती. पाणी ओसरल्यानंतर आता पुलावरील डांबर वाहून गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
बुधवारी रात्रीपासून पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी धोक्याच्या पातळीच्याही वर वाहत होती. गुरुवारी दुपारच्या सुमारास उल्हास नदी १८.८० मीटर उंचीवरून वाहत होती. त्यामुळे बदलापूर पश्चिम येथील वालीवली, हेंद्रेपाडा, रमेशवाडी, बदलापूर चौपाटी परिसर, सोनिवली या भागात पाणी शिरले होते. त्यामुळे ३०० हून अधिक नागरिकांना स्थलांतरित करावे लागले. सायंकाळ नंतर पाणी हळूहळू ओसरू लागले होते. शुक्रवारी सकाळी उल्हास नदी आपल्या मूळ पाणी पातळीवरून वाहत होती. सकाळच्या सुमारास १४.७० मीटर इतकी नदीची पाणी पातळीत नोंदवली गेली त्यामुळे शहराला असलेला पुराचा धोका टाळला आहे.
हेही वाचा…ठाणे जिल्ह्यात ‘समृद्धी’ने पुराची अवकळा
रायते पुलावर डांबर वाहून गेले
कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर रायते पुलावर पाणी साचल्याने मार्ग बंद करण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी पाणी ओसरल्यावर पुलावर खड्डे पडले असून डांबर वाहून गेले आहे. कठडे तुटल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे हा मार्ग दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता.