लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण : कल्याण शहर परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदी काठच्या मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्रात पहाटेपासून उल्हास नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने या केंद्रातील पाणी उपसा पंप बंद ठेवले आहेत. त्यामुळे कल्याण पश्चिमेतील काही भाग, टिटवाळा परिसराला होणारा पाणी पुरवठा काही काळ बंद राहणार असल्याचे कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.

कल्याण डोंबिवली शहरांना उल्हास नदी काठच्या मोहिली, बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. उल्हास नदी रात्रीपासून मुसळधार पावसाने दुथडी भरून वाहत आहे. नदी काठी पालिकेचे मोहिली उदंचन आणि जलशुध्दीकरण केंद्र आहे. पहाटेपासून मोहिली जलशुध्दीकरण केंद्रात पुराचे पाणी शिरू लागले. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपसा पंप बंद करून केंद्रातून बाहेर पडणे पसंत केले.

आणखी वाचा-उल्हास नदी काठच्या २२ गावांना सतर्कतेचा इशारा

हे पंप बंद राहणार असल्याने कल्याण पश्चिमेचा काही भाग, टिटवाळा, मोहने, आंबिवली, अटाळी, वडवली, उंबरणी, बल्याणी काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुराचे पाणी ओसरू लागताच हे पंप पूर्ववत करण्यात येणार आहेत. त्यानंतर पाणी बंद असलेल्या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार आहे. पुराचे पाणी मोहिली केंद्रात शिरले तरी केंद्रात न जाता दूरसंवेदन यंत्रणेतून हे पंप चालू करणे, बंद करण्याची अत्याधुनिक यंत्रणा पालिका प्रशासनाने या केंद्रात बसवली आहे.