पूर, रस्ते बंद झाल्याने भाज्यांची आवक घटली; दरांत ४० ते ८० रुपयांची वाढ

गेले आठवडाभर राज्यभर निर्माण झालेली पूरस्थिती आणि माळशेज, कसारा घाटांतून बंद झालेली वाहतूक यांमुळे मुंबई, ठाणे शहरांना होणारा भाजीपुरवठा रोडावला आहे. वाशी तसेच कल्याण येथील बाजार समितीच्या घाऊक बाजारात एरवी दिवसाला सरासरी ५५० ते ७५० गाडय़ांची आवक होत असते. हे प्रमाण जेमतेम ३०० ते ३५० गाडय़ांवर येऊन पोहचले आहे. श्रावण महिन्यात भाज्यांना अधिक मागणी असतानाच पुरवठा कमी झाल्यामुळे भाज्यांचे दर घाऊक बाजारात १० ते १५ रुपये तर किरकोळ बाजारात ४० ते ८० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

टॉमॅटो, भेंडी, गवार, वांगी, फ्लॉवर, फरसबी, शिमला मिरची, पालक, शेपू, लाल माठ आणि कांद्यांची पात या भाज्या ग्राहकांना ऐन श्रावणात दुप्पट किमतीने विकत घ्याव्या लागत असल्याने ग्राहकांच्या नाकी नऊ आले आहेत. पुणे, नाशिक पट्टय़ातून भाज्यांची आवक वाढल्यास दोन-तीन दिवसांत दर स्थिरावतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या आठवडाभरापासून राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातील ओतूर, आळेफाटा, खेड, मंचर यासारख्या ग्रामीण भागातून तसेच नाशिक येथील ग्रामीण भागातून वाशी आणि कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये वाहनांची मोठय़ा प्रमाणावर आवक होत असते. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मुसळधार पावसामुळे कल्याण अहमदनगर मार्गावरील माळशेज घाटात दरड तसेच झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर दोन दिवसांपासून मुंबई नाशिक मार्गावरील कसारा घाटात रस्ता खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. त्यामुळे पुणे आणि नाशिक येथील ग्रामीण भागातून वाशी आणि कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक घटली आहे.

भाज्यांची वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनचालकांनी मुसळधार पावसामुळे वाहतुकीची जोखमीही स्विकारली नाही. त्यामुळे आवक घटल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात फळभाज्या तसेच पालेभाज्यांच्या विक्री किमतीत वाढ झाली आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवडय़ात दिवसाला सरासरी ५०८ भाज्यांच्या गाडय़ा दाखल होत होत्या. सोमवारपासून हे प्रमाण जेमतेम २५० ते ३०० गाडय़ांपर्यंत येऊन पोहचले आहे, अशी माहिती बाजारभाव समितीचे निरीक्षक जगन्नाथ चव्हाण यांनी दिली. अनेक भागात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांकडून नुकतीच कापणी केलेल्या भाज्यांचेही नुकसान झाल्याची माहिती राजगुरूनगर येथील शेतकरी निखील होले यांनी दिली.

कांदे-बटाटेही महाग

कांदे आणि बटाटे यांच्या दरातदेखील किरकोळ बाजारात दहा रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. कांदे घाऊक बाजारात १५ रुपये प्रति किलो तर किरकोळ बाजारात ३० रुपये प्रति किलो आणि बटाटे घाऊक बाजारात १७ रुपये प्रति किलो तर, किरकोळ बाजारात ३५ रुपये प्रति किलो एवढय़ा दराने विकले जात आहेत. आठवडय़ापूर्वी किरकोळ बाजारात २० रुपये प्रति किलो कांदे आणि २५ रुपये प्रति किलो बटाटे विकले जात असल्याची माहिती ठाण्यातील किरकोळ कांदे बटाटेविक्रेत्यांनी दिला आहे.

शनिवार आणि रविवार राज्यभरात पडलेल्या पावसामुळे काही भाज्यांचे नुकसान झाले आहे. बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे.

– राजेश वर्मा, किरकोळ भाजी विक्रेते