वसईत विविधरंगी, आकर्षक फुलांचा बहर; निसर्गप्रेमी, छायाचित्रकारांची गर्दी

‘श्रावणसरीत मृदगंध ओला, फुलांफुलांतून गंध भरला..’ या काव्यपंक्तीप्रमाणे वसईत सध्या विविधरंगी, आकर्षक फुलांचा बहर आला आहे. ठिकठिकाणी फुललेल्या या आकर्षक फुलांमुळे वसईचा परिसर आल्हाददायक बनला आहे.

श्रावण म्हणजे निसर्गाचे दान. याच श्रावणात निसर्ग आपल्या हिरव्या श्रीमंतीने निसर्गप्रेमींचे लक्ष वेधतो. वसईतही सध्या अशा प्रकारचे निसर्गसुंदर दृश्य पाहावयास मिळत आहे. वसईत श्रावणमासी फुलांना बहर आल्याने त्यांचे दर्शन वसईकरांना होत आहे. वसईतील डोंगर, समुद्रकिनारे, बाग-बगीचे हिरवेगार झालेले असून यामध्ये अनेक प्रकारची सुवासिक फुले नजरेस पडत आहे.

या फुलांमध्ये ब्रह्मकमळ, तेरडा, अनंत, लीली, सोनटक्का, गंधारी, अग्निशिखा, जय, कुडा, लाल तेरडा, कर्णफुले, घारेणीची फुले यांसारख्या अनेक प्रकारच्या फुलांचा समावेश आहे. ही आकर्षक फुले कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी छायाचित्रकांची वसईत गर्दी झालेली आहे. सामान्य नागरिकही मोबाइलमध्ये या फुलांचा बहर टिपत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वसईतील ग्रामीण भागातील निर्मळ, भुईगाव, सुरुची बाग, नायगाव, उमेळा, गिरीज, बोळींज, आगाशी या परिसरात ही फुले मोठय़ा प्रमाणावर आढळून येत आहेत. या फुलांसोबत भिरभिरणारे कीटक व फुलपाखरे मन मोहून टाकत आहेत. हा फुलांचा बहर डोळय़ात साठवण्यासाठी निसर्गप्रेमी वसईत गर्दी करत आहेत.=

सोनटक्का, ब्रह्मकमळाचे दर्शन

सोनटक्का आणि ब्रह्मकमळाचा या दोन्ही झाडांना ऐन पावसाळय़ात बहर येतो. ब्रह्मकमळ ऑगस्ट, सप्टेंबर या पावसाळी महिन्यांतच येतात.  जेवढी पानाला विस्तारायला जागा, तेवढे पानांचे फुटवे वाढतात. त्यानुसार कळ्या, फुले येण्याची शक्यता वाढते. याला थोडा उग्र वास असतो, तरीही तो आल्हाददायक असतो. रात्री फूल उमलायला सुरुवात होते आणि मध्यरात्री ते फूल पूर्ण उमलते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते कोमेजून जाते.

वसईत निसर्गाचा ठेवा निसर्गप्रेमींनी जपला असल्याने श्रावणात निसर्गाच्या रंगांची मेजवानी छायाचित्रकार व निसर्गप्रेमींना मिळत आहे. श्रावणात बहरलेल्या या आकर्षक फुलांना आणि त्यावरील रंगबेरंगी फुलपाखरांना टिपण्यासाठी छायाचित्रकार वर्षभर वाट पाहतात. ही संधी आता आम्हाला मिळाली असून त्याचा पुरेपूर आनंद घेत आहोत.

अजिंक्य वैती, निसर्गप्रेमी, छायाचित्रकार

Story img Loader