पावसाळ्याच्या अवघ्या चार महिन्यांमध्ये येऊरच्या जैवविविधतेला बहर येत असतो. निसर्गाची विविध रंगी लयलूट पाहण्याची संधी याच काळात मिळत असल्याने अनेकांची पावले या नयनरम्य निसर्गाच्या दर्शनासाठी येऊरच्या जंगलात वळतात. रानफुलांची उधळण प्रत्येक ठिकाणी पाहण्याची संधी याच काळात आपणास मिळत असते. जूनचा पाऊस झाला की या ठिकाणी काही ठरावीक वनस्पती क्रमाक्रमाने उगवतात. अवघ्या पंधरवडय़ात जंगलाचे रूप पालटते. दूरवर नजर जाईल तिथे डोळ्यांचे पारणं फेडणारी ही रंगीबेरंगी फुले दिसतात. विविध रंगांच्या या रानफुलांमुळे डोळ्यांचे पारणे फिटते. लिलीसारख्या कुळातील या वनस्पतींचा कंद जमिनीत असतो. पहिला पाऊस पडला की प्रथम त्यातून फुलोरा बाहेर येतो. त्यानंतर सावकाश पाने येतात. लगेचच फलधारणा होते. बिया तिथेच पडतात. पानांनी तयार केलेलं अन्न खालच्या कंदात साठवून या वनस्पती जमिनीवरून नाहीशा होतात. या वनस्पती जमिनीलगत असल्याकारणाने चालताना जपून बघत चालावं लागतं, अशी माहिती फर्न संस्थेच्या सीमा हर्डिकर यांनी दिली.
पानकुसुम : पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीला येते ती ‘फॉरेस्ट स्पायडर लिली’ किंवा पानकुसुम. ४ ते ५ सेंटीमीटर आकाराची पांढऱ्या रंगाची ही सुवासिक फुलं सायंकाळी उमलतात आणि दुसऱ्या दिवशी दिवस चढू लागताच कोमेजून जातात. आपल्या बागेतल्या स्पायडर लिलीसारखाच या सहा पाकळ्यांच्या फुलात पुंकेसराच्या तळाशी पातळ पापुद्रय़ासारखा दातेरी पेला तयार झालेला असतो. जून महिन्याच्या अगदी सुरुवातीला ही फुले दिसतात.
काळी मुसळी : यानंतर येते ती काळी मुसळी किंवा ग्राऊंड स्टार लिली. लांबट सुपारीसारख्या पानांमधून पिवळाधमक पाच पाकळ्यांचं छोटंसं फूल उठून दिसतं. यानंतर रानहळदीचे गुलाबी पुष्पदंड दिसायला लागतात. हे सारं पाहायचं असेल तर याच आठवडय़ात येऊरला गेलं पाहिजे.
खाजकांद्य : जमिनीलगत गुलाबी-जांभळे ‘खाजकांद्य’चे तुरे दिसायला लागतात. याची ओळखण्याची खूण म्हणजे याच्या पूर्ण वाढ झालेल्या पानांवर गडद जांभळे ठिपके असतात.
फोडशी : आपण ‘फोडशी’ची भाजी खातो ती हीच. हिची फुलं नाजूक, पांढरी, सुवासिक, अत्यंत देखणी असतात. या क्लोरोफायटम या अनेक प्रजातीनाच ‘सफेद मुसळी’ही म्हणतात. टय़ूबरोसम ही सर्वत्र आढळणारी प्रजाती आहे. आपल्याकडे येऊरच्या जंगलात मात्र याचीच ‘बोरीवलियानम’ नावाची प्रदेशनिष्ठ प्रजाती आढळते.
लिली: अमारीलीडासी कुळातील ‘क्रायनम’ लिलीची फुलं म्हणजे सुंदरतेचा उत्कृष्ट नमुनाच. मोठय़ा पेल्यासारखी दिसणारी ही सहा पाकळ्यांची फुलं गुच्छाने हिरव्या दांडय़ावर येतात. पाने जाड लांबट पात्यांसारखी असतात. आपल्याकडे येऊरमध्ये याची पांढऱ्या गुलाबी रेषा असलेली प्रजात आढळते.ू
सर्व छायाचित्रे: आदित्य सालेकर, सीमा हर्डिकर आणि पराग शिंदे.