वाढत्या तापमानामुळे उत्पादनावर परिणाम; आवक घटल्याने दर दुप्पट
तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढू लागल्याचा परिणाम आता फुलांवरही दिसून येत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे फुलांची आवक मोठय़ा प्रमाणात घटली असून याचा परिणाम दरांत वाढ होण्यात झाला आहे. आज, मंगळवारी असलेल्या अंगारकी चतुर्थीसाठी सोमवारी ठाण्यातील फूलबाजारात ग्राहकांची गर्दी होती. मात्र, गोंडा, गुलछडी, कापरी गोंडा, बिजली अशा सर्वच फुलांचे दर दीड ते दोनपटीने वाढल्याचे दिसून आले. किरकोळ बाजारात गेल्या आठवडय़ात साधारण ८० रुपये किलोने विकला जाणारा गोंडा सोमवारी बाजारात १२० रुपये किलो दराने विकला जात होता.
मुंबई, ठाण्यात हैदराबाद, बंगळूरु, पुणे, सातारा या भागांतून फुलांची आवक होते. मात्र, या भागांत सध्या तापमान वाढू लागल्याने फुलांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. बाजारात जवळपास सर्वच फुलांची आवक घटली आहे. त्यातच गेल्या पंधरवडय़ात गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती असे सण एकापाठोपाठ एक आल्याने फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने फुलांचे दर वाढले आहेत.
कल्याण कृषी बाजार समितीच्या घाऊक बाजारात दिवसाला फुलांनी भरलेल्या जेमतेम १५ ते २० गाडय़ाच येत आहेत. याआधी हा आकडा ५० ते ६०च्या घरात होता. त्यामुळे घाऊक बाजारतही फुलांचे दर वाढू लागले असून गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत त्यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे, अशी माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली. उन्हाळय़ामुळे शेवंतीची फुले बाजारात येणे बंद झाले आहे. त्याऐवजी बिजलीनामक फुलाची पुणे तसेच बंगळूरु भागातून आवक सुरू झाली आहे, अशी माहिती कृषी बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी दिली. साधारणपणे उन्हाळ्याच्या हंगामात फुलांची आवक घटते हे जरी खरे असले तरी यंदा हे प्रमाण अधिक आहे, असे घोडिवदे यांनी स्पष्ट केले. मंगळवारी अंगारकी चतुर्थी आणि एप्रिलच्या मध्यावर असलेला अक्षय्यतृतीयेचा मुहूर्तावर हे भाव आणखी वाढतील, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
फूल सध्याचे भाव मागील
आठवडय़ातील भाव
गोंडा १२० ८०
गुलछडी ३०० १५०
मोगरा ५०० ३००
कापरी गोंडा ७० ४०
बिजली ८० ४०
(दर रुपये प्रति किलो)
फूलविक्रेत्यांची तारांबळ
फुले बाजारात येईपर्यंत कोमेजतात अशा तक्रारी फूलविक्रेत्यांकडून सातत्याने पुढे येत आहेत. सतत पाण्याचा मारा करून ही फुले टिकविण्यासाठी विविध युक्त्या फूलविक्रेत्यांकडून लढविल्या जात आहेत. कोणी फुलांच्या गोणीवर पाणी मारत आहे तर कोणी देठवाल्या फुलांना पाण्याच्या बादलीत ठेवत आहेत. त्यामुळे पुष्पगुच्छांचे भावदेखील वधारले आहेत.