किमतीत १५ ते ३० रुपयांची वाढ
गणपती, दसरा, दिवाळी या सणासुदीत अधिक आवक झाल्याने स्वस्त असलेली फुले मार्गशीर्ष महिन्यात मात्र महागली आहेत. राज्यभरातील दुष्काळसदृश स्थितीचा फटका फुलांना बसला आहे. किरकोळ बाजारात फुलांचे दर जवळपास १५ ते २० रुपयांनी वधारले आहेत. तर घाऊक बाजारातही एरवी कवडीमोलाने विकला जाणारा पिवळा झेंडू सध्या १० रुपये किलोने विकला जात आहे.
मुंबई परिसराला जुन्नर, नाशिक, नगर, बंगळूरु आणि गुजरातमधून फुलांचा पुरवठा होतो. पाऊस चांगला झाल्याने फुलांचे उत्पादन वाढले होते. त्यामुळे श्रावण महिन्यातही फुले कवडीमोलाने विकली गेली. त्यानंतर मात्र पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम फुलांवर झाला. त्यामुळे ऐन मार्गशीर्ष महिन्यात किमती वधारल्या आहेत, अशी माहिती ओतुरचे शेतकरी गणेश हांडे यांनी दिली.
कल्याण कृषीउत्पन्न बाजारात येणाऱ्या फुलांच्या गाडय़ांची संख्या ३० ते ४० वरून २० वर आली आहे. गेल्या महिन्यात किरकोळीत १० रुपये किलोने मिळणारा पिवळा गोंडा सध्या २५ रुपये किलोने विकला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महिन्यात फुलांचे भाव कमीच असल्याचे किरकोळ फुल विक्रेते सोपान काळे यांनी सांगितले. सुरुवातीच्या काळात अधिक पाऊस झाल्याने फुलांना फटका बसला होता. त्यानंतर मात्र पावासाने माघार घेतली आणि आता फुलांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
फुलांचे भाव वधारले असून येत्या काही दिवसांत ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. हिवाळा संपताच उन्हाच्या झळाही फुलांना सहन कराव्या लागतील. त्यामुळे फुले लवकर कोमजतील. सद्य:स्थितीत फुलांचे उत्पादन कमी आहे.
– शामकांत चौधरी, कल्याण कृषी बाजार समिती