ठाणे : ठाणे पुर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प’ (सॅटीस ) प्रकल्पामध्ये रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उड्डाण पुलांची उभारणी झाली असली तरी त्याच्या जोडणीचे काम मात्र लांबल्याचे चित्र होते. दरम्यान, हे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार असून त्यासाठी रेल्वे विभागाकडून रात्रीच्या वेळेत दोन तासांचे एकूण १९ ब्लाॅक घेण्यात येणार आहेत. महिनाभरात हे काम पुर्ण केले जाणार असून यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या या कामाला आता वेग येताना दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेवरील या महत्त्वाच्या स्थानकातून रोज साडेसात लाख प्रवासी ये-जा करतात. या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी स्थानकाच्या पश्चिमेला सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली. यामुळे येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षात ठाणे पुर्व स्थानक परिसरातही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. ठाण्यासह विविध परिवहन उपक्रमांच्या बोरिवली भागात जाणाऱ्या बसगाड्या येथून सुटतात. याशिवाय, खासगी बसगाड्याही येथूनच वाहतूक करतात. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा फलाट जवळ असल्यामुळे हे प्रवासी सुद्धा स्थानकाच्या पुर्व भागातून वाहतूक करतात. यामुळे गेल्या काही वर्षात येथे वाहतूक कोंडीची निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पश्चिमेच्या धर्तीवर ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून स्थानकाच्या पूर्वेला सॅटीस प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. सुमारे २६० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

हेही वाचा…जिल्ह्यात वाहन नोंदणीत वाढ सर्वाधिक वाहन नोंदणी ठाणे, मिरा भाईंदर आणि भिवंडीत

ठाणे महापालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करत हाती घेतलेल्या सॅटिस प्रकल्पात विविध अडथळे आले. प्रकल्पाचा आराखडा बदल आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या यामुळे हा प्रकल्पाच्या कामास विलंब झाला. या जागेवरील रेल्वे विभागाची बांधकामे, शौचालये तसेच इतर अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत बराच कालावधी लागला. यामुळे स्थानकाच्या पूर्वेला डेक उभारणीचे काम रखडले होते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून हे काम वेगाने सुरू आहे. तसेच या प्रकल्पातील रेल्वे रुळांवरील पूलजोडणीचे काम शिल्लक होते. रेल्वेच्या ओव्हर हेड वायरच्या खांबाची उंची कमी करण्याच्या कामासाठी पालिकेने रेल्वे विभागाकडे काही महिन्यांपुर्वी १ कोटी ९० लाख रुपये जमा केले होते. हे काम रेल्वे विभागाने नुकतेच पुर्ण केले आहे. आता पुढच्या टप्प्यात पुल जोडणीचे काम हाती घेतले जाणार आहे.

अशी होणार पुल जोडणी

ठाणे पुर्व सॅटीस प्रकल्पातील रेल्वे मार्गिकेवरील पुल जोडणीसाठी एकूण सहा गर्डर टाकण्यात येणार आहेत. या कामासाठी पालिकेने रेल्वे विभागाला एक पत्र पाठविले आहे. या पुलाच्या कामासाठी रात्रीच्या वेळेत दोन तासांचे एकूण १९ ब्लाॅक घ्यावे लागणार असून त्याचे नियोजन करण्याचे काम रेल्वे विभागामार्फत सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रेल्वे विभागाक़डून या कामाला मंजुरी दिली जाणार आहे. महिनाभरात हे काम पुर्ण केले जाणार आहे. प्रकल्प असा

या प्रकल्पात तुळजा भवानी मंदिर, पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ता ते कोपरी कन्हैया नगर, एमजेपी कार्यालयापर्यंत एकूण २.२४ किमी लांबीचा उन्नत मार्ग. यात १२ मीटर रुंद मार्गिका. स्थानकात वाहतूक व्यवस्थापनासाठी ९ हजार चौरस मीटर डेक उभारणी. डेक उन्नत मार्गाला जोडण्यात येणार असून त्यात ‘स्टेशन बिल्डिंग’चाही समावेश असेल.

हेही वाचा…ठाण्याचा विकास आराखडा निवडणुकांमुळे पडद्याआड? दोन महिन्यांत जेमतेम ६०० हरकती

डेकच्या तळघरात दुचाकी व चारचाकींसाठी वाहनतळ.

ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्पातील रेल्वे मार्गिकेवरील पुल जोडणी कामाबाबत रेल्वे विभागासोबत नुकतीच एक बैठक झाली असून त्यानुसार रेल्वे विभागाला एक पत्रही पाठविण्यात आले आहे. रेल्वे विभागाकडून येत्या काही दिवसांत परवानगी मिळताच कामाला सुरूवात होईल.संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flyover built in satis project but connection work delayed sud 02