ठाणे : मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) कापूरबावडी जंक्शन परिसरात सुरू आहे. या कामासाठी येथील हलक्या वाहनांसाठी सुरु असलेला उड्डाणपूल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कापूरबावडी चौक सायंकाळी आणि रात्रीच्या वेळेत कोंडीचे केंद्र ठरत आहे. मेट्रोच्या कामासाठी किमान महिनाभर येथील उड्डाणूपल बंद राहणार आहे. त्यामुळे घोडबंदर, ढोकाळी, कोलशेत, माजिवडा भागातील नागरिकांना आता कोंडी हैराण झाले असून कोंडी सोडविताना वाहतुक पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत. वाहन चालकांना पाच मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी किमान अर्धा ते पाऊण तास लागणार आहे.
वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा कापूरबावडी भागातील आहे. कापूरबावडी चौकातून घोडबंदर, भिवंडी येथील कशेळी-काल्हेर, कोलशेत, ढोकाळी भागातून वाहतुक करतात. त्यामुळे या मार्गावरून वाहतुक करणाऱ्या वाहनांचे प्रमाण अधिक आहे. तसेच घोडबंदर, बोरीवली, मिरा भाईंदर, वसई भागात जाणाऱ्या टीएमटी, एसटी महामंडळ तसेच इतर परिवहन सेवेच्या बसगाड्या धावतात. कापूरबावडी येथील वाहतुक कोंडी सुटावी यासाठी चौकामध्ये लहान आकाराचा उड्डाणपूल बांधण्यात आलेला आहे. उड्डाणपूलामुळे चौकातील कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळत होता.
आता या चौकात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरू आहे. त्यामुळे येथील उड्डाणपूलावरुन होणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतुक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा परिणाम मागील चार दिवसांपासून कापूरबावडी येथील वाहतुक व्यवस्थेवर बसू लागला आहे. सांयकाळी ६ वाजेपासून आता कापूरबावडी चौक, माजिवडा, गोकूळनगर भागात वाहनांच्या रांगा लागण्यास सुरूवात होते. माजिवडा चौक अधिक रहदारीचा असल्याने कोंडीत भर पडू लागली आहे. ही वाहतुक कोंडी सोडविताना ठाणे वाहतुक पोलिसांच्या नाकी नऊ येत आहे. गोकुळनगर ते कापूरबावडी चौक हे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना अर्धा ते पाऊण तास लागत आहे. मेट्रोचे काम किमान एक महिना या चौकात राहणार आहे. त्यामुळे कापूरबावडी चौकातून वाहतुक करताना नागरिकांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे.
याबाबत वाहतुक पोलिसांना विचारले असता, येथील कोंडी कमी करण्यासाठी वाहतुक बदल केले जाणार आहेत. तसेच नागरिकांनी नियमांचे पालन करुन वाहने चालविल्यास, विरुद्ध दिशेने वाहने चालविणे बंद केल्यास वाहतुक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळू शकेल असे त्यांनी सांगितले.