वाढत्या नागरीकरणाची ‘एमएमआरडीए’कडून दखल

बदलापूरमध्ये वेगाने वाढत असलेल्या लोकसंख्येची दखल घेत एमएमआरडीएने शहरात आणखी दोन उड्डाणपूल बांधण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. ठाण्याच्या तुलनेत स्वस्त घरे उपलब्ध असल्याने बदलापूरची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्याचा ताण पायाभूत सुविधांवर पडू लागला आहे. सध्या शहरात पूर्व पश्चिम विभागांना जोडणारा एकमेव उड्डाणपूल आहे. भविष्यातील वाढते नागरीकरण लक्षात घेऊन दोन नवे पूल बांधण्यास तत्त्वत मान्यता दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

२०११ च्या जनगणनेनुसार बदलापूरची लोकसंख्या पावणेदोन लाख असली तरी गेल्या पाच वर्षांत ती तीन लाखांच्या घरात  गेली आहे. सध्या २० ते २५ हजार घरे बांधून पूर्ण अथवा निर्मिती अवस्थेत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत आणखी लाख ते दीड लाख लोकसंख्येची भर बदलापुरात पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उच्च आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय नोकरदार वर्ग मोठय़ा प्रमाणात असल्याने वाहनांची संख्याही कमालीची वाढली आहे. त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला आहे. शहरातील पूर्व आणि पश्चिमेतील बाजारपेठ, पालिका मुख्यालय परिसर, कात्रप परिसर अशा भागांत सर्वाधिकवर्दळ असते. त्यामुळे अशा भागांत मोठी वाहतूककोंडी होत आहे. शहराची लोकसंख्या वाढली, मात्र शहराला दुसरा उड्डाणपूल मिळाला नाही. सध्या शहरातील सर्व वाहतूक या एकमेव उड्डाणपुलावरून होत आहे. त्यात उड्डाणपुलाच्या उतरण्याच्या ठिकाणी रस्ते अरुंद असल्याने तिथे वाहतूक कोंडी होते. पालिका मुख्यालयासमोरील चौकातही मोठी कोंडी असते. दुपारच्या वेळी शाळांच्या बसेस आणि इतर वाहनांमुळे उड्डाणपुलावर दोन मिनिटांचे अंतर कापण्यासाठी २०-२५ मिनिटे घालवावी लागतात. त्यामुळे उड्डाणपुलावरून यावेळी वाहतूक करणे कठीण होते. कर्जत, खरवई आणि अंबरनाथहून बदलापूरगावमार्गे पुढे जाणाऱ्यांचा भार एकच उड्डाणपुलावर पडतो. शहरांतर्गत वाहतुकीसाठीही बाजारपेठेतून मार्ग काढत उड्डाणपूल गाठावा लागतो. त्यामुळे शहरात वाहतूककोंडीचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत वाढले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी दोन नव्या उड्डाणपुलांची मात्रा अवलंबण्यात येणार आहे.

येथे उड्डाणपूल होतील

शहरात बॅरेज रोड ते होप इंडिया आणि चिखलोली ते वडवली किंवा बेलवली असे दोन उड्डाण पूल प्रस्तावित आहेत. एमएमआरडीएतर्फे याबाबत आराखडा तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे बोलले जाते. अर्थात आणखी काही वर्षे तरी एकाच उड्डाणपुलावरून बदलापूरकरांना ये-जा करावी लागणार आहे.

बॅरेज रोड ते होप इंडिया आणि चिखलोली ते बेलवली असे दोन उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. एमएमआरडीएकडून हे काम पूर्ण केले जाणार असून बॅरेज रोड येथील उड्डाणपुलाचा आराखडा तयार आहे. येथील भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. पुढील तीन वर्षांत ही कामे मार्गी लागतील.

किसन कथोरे, आमदार.

पहिल्या उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर काही वर्षांतच आणखी दोन उड्डाणपुलांची मागणी एमएमआरडीएकडे केली होती. शहरातील वाहतुकीची विभागणी झाल्यास अंतर्गत प्रवास सोपा आणि कमी वेळात होणार आहे.

राम पातकर, माजी नगराध्यक्ष

Story img Loader