नवी मुंबई ही जागतिक बाजारपेठेचे केंद्र असलेल्या मुंबईच्या वेशीवरील शहरे सर्वागाने विकसित होत आहेत. याच शहरांजवळ कल्याण-डोंबिवली शहरे आहेत. अन्य शहरांप्रमाणे आपलेही शहर विकसित व्हावे, असे कल्याण-डोंबिवली शहरातील लोकप्रतिनिधी, प्रशासक, अधिकाऱ्यांना का वाटत नाही? महापालिकेच्या स्थापनेपासून फक्त गटारे, पायवाटा, पेव्हर ब्लॉक आणि टक्केवारीमध्येच अधिकारी आणि नगरसेवक का अडकून पडत आहेत. असा किरकोळ खर्च करण्यापेक्षा एकत्रित निधीतून शहरात उड्डाणपूल, पर्यायी रस्ते, भुयारी मार्ग अशी विकासाची कामे घेतली जावीत.
शहरातील रस्ते अद्ययावत असणे आवश्यक आहे. मात्र रस्त्यांपेक्षा वाहनांची संख्या अधिक असल्याने शहरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीवर उपाय म्हणजे टिळक चौक ते घरडा सर्कल, पाटणकर चौक (फडके चौक) ते आयकॉन रुग्णालयापर्यंत उड्डाणपुलांची गरज आहे. मानपाडा रस्ता, मंजुनाथ शाळा रस्ता हे शहरातील दोन मुख्य रस्ते आहेत. या रस्त्यांना असणाऱ्या पोहच रस्त्यांवर पादचारी पूल उभारणे आवश्यक आहे.
एकच रस्ता असा तयार करा की पुढील किमान दहा वर्षे त्याला हात लावण्याची गरज लागणार नाही. रस्ते तयार करण्याचे अशा प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान हल्ली उपलब्ध आहे. एखादा रस्ता सिमेंट, डांबरीकरणाने पक्का केला, की त्या रस्त्यावर पुन्हा कोणाला खोदायला परवानगी देऊ नका. अलीकडे नवीन रस्ता तयार झाला, की त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या रस्त्यावर दूरसंचार, महावितरणकडून खोदकाम सुरू केले जाते. हा प्रकार कायमचा थांबण्यासाठी ठेकेदारांना दंड ठोठवा. डोंबिवली पूर्व भागातून पश्चिम भागात जाण्यासाठी कोपर पूल हा एकमेव उड्डाण पूल आहे. या पुलाला पर्याय नाही. भविष्यकालीन गरज ओळखून या पुलाला नवीन उड्डाण पूल उभारणे गरजेचे आहे. स. वा. जोशी शाळेजवळ उड्डाण पूल प्रस्तावित आहे. पूर्व, पश्चिम भाग जोडणारे दोन पूल तयार झाले तर एकाच रस्त्यावर अलीकडे जो भार येतो तो कमी होण्यास मदत होईल.
संदीप घरत, उद्योजक
भाजप आमदारांकडून शहराकडे दुर्लक्ष
भगवान मंडलिक, कल्याण<br />केंद्र, राज्यातील सत्तेत भाजपच्या येण्याने सुदिन येत असतील तर, हेच दिवस कल्याण-डोंबिवली शहरांना मागील तीस ते पस्तीस वर्षांपूर्वीच येणे अपेक्षित होते. अनेक वर्षांपासून या शहराचे विधिमंडळातील नेतृत्व जनसंघाच्या वाटेवरून आलेले भाजप आमदार करीत आहेत. दिवंगत रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटील, हरिश्चंद्र पाटील, अशोक मोडक अशा विचारी मंडळींनी या शहरांचे नेतृत्व केले. अलिकडच्या काळात आमदार रवींद्र चव्हाण, नरेंद्र पवार या विचारी मंडळींचा वारसा चालवत आहेत. या शहरातील बुद्धिजीव, मध्यमवर्गीय, सामान्य लोक आपल्या पाठीशी आहेत म्हणून भाजपचे कमळ वर्षांनुर्वष शहरात फुलले. या शहरांच्या विकासासाठी आपण खूप काही करावे, असे कधी या मंडळींना वाटले नाही. म्हाळगी, कापसे यांच्या कार्यकाळात शहरात काही विकासकामे झाली. त्यांच्या नंतरच्या आमदारांना विकासासाठी रग्गड विकास निधी मिळत होता. या निधीतून काही विकासकामे शहरात झाली असती तरी, कल्याण-डोंबिवलीला केव्हाच ‘अच्छे दिन’ आले असते.
राज्यातील युती सरकारच्या काळात आमदार जगन्नाथ पाटील यांना मंत्रीपद मिळाले होते. त्या मंत्रीपद अधिकाराच्या कोणत्याही पाऊलखुणा शहरात दिसत नाहीत. माजी मंत्री गणेश नाईक हेही आगरी समाजाचे. तेही मंत्री होते. त्यांनी नवी मुंबई शहराचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न केले, तसे प्रयत्न कल्याण-डोंबिवलीच्या बाबतीत का झाले नाहीत, असे प्रश्न आता लोक उपस्थित करू लागले आहेत.
नागरी विकास कामांपेक्षा वर्धा येथील बीयर बारचे रद्द झालेले परवाने डोंबिवलीत आणून बीयर शॉपींची उगवण डोंबिवलीतील गल्लीबोळात केली गेली. एक पिढी या बीयर शॉपीने सुजरीफुगरी केली. शहराला मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर या शहरात कोणते महान काम झाले ते फक्त बीअर शॉपींचे. विचारवंत, अभ्यासू भाजपचे आमदार डॉ. अशोक मोडक अनेक र्वष डोंबिवलीचे रहिवासी होते. शहरातील समस्यांची त्यांना प्रखर जाणीव होती. त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून, मिळालेल्या निधीतून अनेक विकासकामे केली ती सगळी कोकणात. कोकणातील सुपारीचा प्रश्न सोडविण्यात आमदार मोडक यांनी जसे प्रयत्न केले, तसे प्रयत्न कल्याण-डोंबिवलीतील काही नागरी समस्येची, विकासकामे करण्यासाठी केले असते तर आज जे शहराला बकाल रूप आले आहे ते काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली असती.
भाजपचे आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी या शहरांचे नेतृत्व केले. त्यांनी या शहरातील काही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. महापौरपदाच्या काळात त्यांनी काही चांगली कामे करून दाखविली. पाटील यांचे तोंड ताब्यात नसल्याने बुद्धिजीवी, मध्यमवर्ग त्यांच्यावर नाराज होता. त्यामुळे आमदारकीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताच, त्यांचा पत्ता कापण्यात आला.
भांडुपमधून एक उमदा तरुण डोंबिवलीत आला. रवींद्र चव्हाण त्यांचे नाव. जेवढी चकमक, मनोरंजनात्मक असेल त्याला डोंबिवलीकर लगेच भुलतात, हे या तरुणाने हेरले. त्याच्या कार्यपद्धतीवर जनतेसह भाजपही फिदा झाली. या तरुणाने शहरात शिरकाव करताच पालिकेत भाजपकडून नगरसेवक पद भूषविले. स्थायी समिती सभापतीपद उपभोगले. जादूची कांडी फिरविल्यासारखा या तरुणाचा कारभार डोंबिवलीत सुरू होता.
हरिश्चंद्र पाटील यांचा पत्ता कापल्यानंतर रवींद्र चव्हाण यांना भाजपने आमदारकीची उमेदवारी दिली. वेदभवन बांधून देतो, मुंब्रा-डोंबिवली समांतर रस्ता विकासाच्या छान घोषणा त्यांनी केल्या. त्या त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने मागे पडल्या. डोंबिवलीकरांना विकासकामांपेक्षा मनोरंजन, माहिती, दूध पुरवले की त्यांना समस्यांचे भान राहात नाही हेही चव्हाण यांना माहिती असल्याने ते निवडणूक काळात आपले स्वत:चे व्यवस्थापन राबवून विरोधक आणि संघ मंडळींनी किती आकांडतांडव केले तरी निवडून येतात. या दोन्ही शहरांना सुविचारी आमदार मिळाले. तो विचार कोत्या वृत्तीचा असल्याने त्यांच्या राजकीय, सामाजिक विचारांचा लाभ या शहरांच्या विकासासाठी झाला नाही. आमदारकी संपली तसे या मंडळींचे अवतारकार्य संपले. या शहरातील आपली मतदार जनता धूळ, चिखलातून पायपीट करीत आहे, याचे कोणतेही सोयरसुतक या ‘अच्छे दिन’ मंडळींना नाही.