अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीपात्रात बुधवारी सकाळच्या सुमारास फेसाळ थर आल्याचे समोर आले. अंबरनाथ एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांमधून या नदीत रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या. तसाच प्रकार यंदाही समोर आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
हेही वाचा >>>ठाणे: कोळसेवाडी शाखेच्या वाहतूक अधिकाऱ्याने रिक्षा चालकाकडे मागितली ५०० रुपयांची लाच; व्हिडिओ व्हायरल
अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत अनेक वर्षांपासून रासायनिक कारखान्यांकडून सांडपाणी सोडले जाते आहे. अनेक प्रयत्नानंतरही यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही. या सांडपाण्यामुळे वालधुनी नदीची गटारगंगा झाल्याने त्याचा आसपासच्या परिसरावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी सकाळी वालधुनी नदीत प्रदूषणाचा फेस जमा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला. वालधुनी नदीत आजवर झालेल्या प्रदूषणानंतर दरवेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांची पाहणी केली जाते. त्यानंतर कारखान्यांना नोटिसा बजावल्या जातात. मात्र यानंतर पुन्हा एकदा कंपन्यांकडून राजरोसपणे नदीत रासायनिक सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एकंदरीत कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.