ठाणे : सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे (७३) यांच्या अपघाती मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच याच महामार्गापासून काही मीटर अंतरावर असलेल्या नितीन कंपनी भागात आणखी एका वृद्धाच्या अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. येथील सिद्धेश्वर तलाव बस थांबा परिसरात रस्ता ओलांडत असताना ६९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सोमवारी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नितीन कंपनी भागात ६९ वर्षीय व्यक्ती शनिवारी सायंकाळी कामावरून घरी परतत होते. सिद्धेश्वर तलाव परिसरात रस्ता ओलांडत असताना त्यांना एका भरधाव दुचाकीने धडक दिली. या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नितीन कंपनी येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने रविवारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच पुष्पा आगाशे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा याच महामार्गावर वृद्ध पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
© The Indian Express (P) Ltd