कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा, विदर्भातील खाद्यसंस्कृतीचा अस्वाद घेण्याची संधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता माध्यम प्रायोजक

अंबरनाथ : चित्र, शिल्प आणि संगीत क्षेत्रातील उत्तमोत्तम कलाविष्कारांची अनुभूती देणाऱ्या ‘अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’मध्ये यंदा महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचाही आनंद खवय्यांना घेता येणार आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील चविष्ट खाद्यपरंपरा हे यंदाच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण आहे. ‘चव महाराष्ट्रा’ची हे खास दालन मांडण्यात येणार आहे.

‘खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊ ंडेशन’ आयोजित आणि ‘लोकसत्ता माध्यम प्रायोजक’ असलेला चौथा शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल १ मार्चपासून अंबरनाथच्या शिवमंदिरात सुरू होणार आहे. महोत्सवात चित्रकला, शिल्पकला आणि संगीताचे विविध कलाविष्कार एकाच वेळी एकाच ठिकाणी पाहता येतात. त्यामुळे मुंबई, ठाण्यासह आसपासच्या नगरांमधील कलाप्रेमींची दरवर्षी याठिकाणी झुंबड उडत असते. यंदा या महोत्सवात महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आणि परंपरा हे विशेष आकर्षण ठरणार आहे. चव महाराष्ट्राची हे आगळेवेगळे दालन खवय्यांसाठी पंगत मांडणार आहे.

‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’मध्ये महाराष्ट्रातल्या पाच विभागांतली वैशिष्टय़पूर्ण खाद्य संस्कृती एकाच दालनात एकाच वेळी अनुभवण्याची संधी खवय्यांना मिळणार आहे. चव महाराष्ट्राची हे एक आगळेवेगळे दालन आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश आणि विदर्भ या पाचही विभागांची वैशिष्टय़पूर्ण खाद्यसंस्कृती आहे. त्यांचे पदार्थ, त्यांची चव, ते बनवण्याची पद्धत, त्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि भांडी यात वेगळेपण आहे. हे वेगळेपण चव महाराष्ट्राची या दालनात अनुभवता येणार आहे.

खान्देशातील मांडे, मराठवाडय़ातील बिर्याणी, कंदूरी, पश्चिम महाराष्ट्रातला तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, विदर्भातील सावजी मटण, कोकणातले मासे, कोंबडी वडे अशा अनेक पदार्थाची चव या दालनात चाखता येणार आहे. शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचे प्रमुख आणि आगळेवेगळे आकर्षण असलेल्या या दालनाला जरूर भेट देण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी केले आहे.

ग्रामीण भागाची अनुभूती

विविध प्रदेशांतील पाककृतींचे प्रात्याक्षिकही पाहता येणार आहे. त्यासाठी त्या त्या भागातली भांडी, रचना केली जाणार आहे. बांबू, चटई, कापडाचा वापर करून ग्रामीण भागाची अनुभूती देणारे दालन साकारण्यात येणार आहे, अशी माहिती ‘चव महाराष्ट्राची’च्या रंजना प्रभू खानोलकर यांनी दिली. एकाच वेळी एकाच ठिकाणी महाराष्ट्रातील विविध प्रकारची खाद्यसंस्कृती आणि त्यासाठी लागणारी पारंपरिक भांडी, साहित्य उपस्थितांना विकत घेता येणार आहे.