डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन या रेल्वे स्थानकातील फलाटांवरील प्रवासी गर्दीला अडथळा ठरणारी उपहारगृहे हटविण्यात आली आहेत. ही उपहारगृह रेल्वे स्थानका बाहेरील रेल्वेच्या हद्दीत तिकीट खिडकीजवळ, फलाटांच्या एका बाजुला स्वच्छतागृहांजवळ स्थलांतरित करण्यात आली आहेत. ही उपहारगृह हटविण्यात आल्याने प्रवाशांची कुचंबणा होऊ लागली आहे.
मध्य रेल्वे स्थानकावरील डोंबिवली सर्वाधिक प्रवासी गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. या फलाटावर मागील अनेक वर्षापासून रेल्वेच्या परवानगीने प्रवाशांच्या खानपान सेवेसाठी उपहारगृहे सुरू होती. ही उपहारगृहे जिन्यांच्या मार्गात यापूर्वी उभारण्यात आली होती. जुन्या काळात उभारण्यात आलेली ही उपहारगृहे फलाटावरील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे आता अडथळा ठरू लागली होती.
डोंबिवली रेल्वे स्थानकात स्कायवाॅकचे आधारखांब, पुलाचे लोखंडी सांगाडे यांची गुंतागुंत आहे. हे सगळे अडथळे अगोदरच असताना, डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांवरील उपहारगृहे सकाळ, संध्याकाळच्या वेळेत प्रवासी गर्दीला अडथळा ठरू लागली होती.
डोंबिवली स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन प्रवाशांना रेल्वे स्थानकातील फलाटांवर सुटसुटीतपणे जाता यावे. उभे राहता यावे या विचारातून मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात डोंबिवली रेल्वे स्थानकाची पाहणी केली. या पाहणीच्यावेळी या स्थानकातील उपहारगृहे ही प्रवाशांच्या येण्याच्या जाण्याच्या मार्गात आणि गर्दीच्या वेळेत अडथळा ठरत असल्याचे दिसून आले होते. अधिकाऱ्यांनी फलाटावरील उपहारगृहे रेल्वे स्थानकालगतच्या रेल्वेच्या जागेत रेल्वे तिकीट खिडक्यांजवळ व फलाटाच्या एका बाजुला स्वच्छतागृहांजवळ प्रवासी वर्दळ नसलेल्या भागात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाप्रमाणे डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन, तीन आणि पाच वरील उपहारगृहे अन्य भागात स्थलांतरित करण्याचा निर्णय रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतला. उपहारगृह चालकांना त्यासंबंधी नोटिसा देऊन महिनाभराची मुदत देण्यात आली. उपहारगृह चालक मे. एस. एच. जोंधळे केटरिंग लायसन्स, मे. ए. एच. व्हिलर यांनी रेल्वे प्रशासनाकडे उपहारगृह हटविण्यासंबंधी मुदत वाढून देण्याची मागणी केली. रेल्वे प्रशासनाने ही मागणी फेटाळली. विहित वेळेत उपहारगृह स्थलांतरित केली नाहीतर कारवाई करण्याचा इशारा दिला.
हेही वाचा >>> ठाण्यासह दिवा, कळवा, मुंब्य्रात आज पाणी नाही
त्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांंक दोनवरील उपहारगृह फलाटावरील कल्याण बाजुला स्कायवॉकखाली, पाचवरील उपहारगृह रामनगर रेल्वे तिकीट खिडकीजवळ स्थलांतरित करण्यात आली आहेत. ही उपहारगृहे स्थलांतरित करण्यात आल्याने प्रवाशांची मात्र गैरसोय होऊ लागली आहे. नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आलेली स्वच्छतागृहे एका बाजुला आणि प्रवासी वर्दळीपासून दूर असल्याने ग्राहक येत नाहीत. स्वच्छतागृहाजवळील दुर्गंधीमुळे उपहारगृहाकडे प्रवासी फिरकत नाहीत, अशा तक्रारी चालक करू लागले आहेत.