ठाणे : वर्तकनगर यथील रेमंड कंपनीच्या जागेवर ठाणे महापालिकेची नवी प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे. यासाठी येथील ६३१ वृक्ष तोडण्याचा तसेच दोन हजार ९७ वृक्षांचे पुनर्रोपन करण्यात येणार असल्याने येथील रहिवाशांनी विरोध केला होता. सोमवारी याबाबत ठाणे महापालिकेत सुनावणी झाली. येथील वृक्ष तोडून नका आणि महापालिकेची नवी इमारत दुसऱ्या ठिकाणी बांधा अशी विनंती करण्यात आली.
वर्तकनगर भागातील रेमंड कंपनीच्या जागेवर ५७२ कोटी रुपये खर्चुन ठाणे महापालिकेची नवी प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. ही इमारत ज्या जागेवर उभारली जाणार आहे, तिथे भव्य असे उद्यान आहे. या उद्यानाच्या जागेचे आरक्षण बदलून तिथे महापालिका इमारत उभारण्याचा निर्णय महापालिकेने होता. या इमारतीसाठी उद्यानातील ६३१ वृक्ष तोडण्याचा तर, दोन हजार ९७ वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने हरकती आणि सुचनाही मागविल्या होत्या. नागरिकांनी महापालिकेच्या या निर्णयास विरोध केला. येथील हिरवळ आणि शांतता पाहून नागरिकांनी गृह खरेदी केली होती. पंरतु आता वृक्ष तोडली जाणार असल्याने रहिवाशांकडून प्रशासनावर टीका केल जात आहे.
येथील रहिवासी सुभाष जगताप यांनी महापालिकेच्या निर्णयास हरकत घेतली होती. त्याबाबत सोमवारी महापालिकेच्या नगर रचना विभागात सुनावणी पार पडली. यावेळी सुभाष जगताप यांनी महापालिका यापूर्वी कोणत्या जागा निश्चित केली होती. त्याची माहिती मागितली. परंतु माहिती देण्यात आली नाही असे जगताप यांनी सांगितले. तसेच वृक्ष तोडू नये आणि नवी इमारत दुसऱ्या जागेत बांधावी अशी विनंती देखील त्यांनी महापालिकेकडे केली. याबाबत राज्य सरकारकडे म्हणणे मांडले जाईल असे सुनावणी दरम्यान सांगण्यात आल्याचे जगताप म्हणाले.