ठाणे : आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू, ठाणे जिल्ह्यातून निवड झालेल्या १० हजार ४२९ विद्यार्थ्यांपैकी केवळ ५ हजार ११३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही. ज्या विद्यार्थ्यांचा अद्याप प्रवेश निश्चित झालेला नाही, त्यांना १० मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती आरटीईच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी १४ जानेवारीपासून सुरुवात झाली. १४ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील २५ हजार ७७४ विद्यार्थ्यांचे आरटीई प्रवेशासाठी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची आरटीई प्रवेशासाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू, ठाणे जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपर्यंत केवळ ५ हजार ११३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असल्याची माहिती आरटीईच्या संकेतस्थळावरील अहवालातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशाकडे पालकांनी पाठ फिरवली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर, आरटीई प्रवेशासाठी निवड झाल्या संदर्भात आणि प्रवेश निश्चित करण्याची माहिती पालकांना दुरध्वनी संदेशाद्वारे दिली जाते. या संदेशाकडे पालकांचे दुर्लक्ष होत असून त्यामुळेच अद्याप काही विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नाही असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला. त्यामुळे पालकांना प्रवेशासाठी आणखी वेळ मिळावा याकरिता प्रवेश घेण्याची तारिख वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील, माहिती आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आता, १० मार्च पर्यंत प्रवेश घेता येणार आहे.

पालकांनी दुरध्वनी संदेशावर अवलंबून राहू नये

आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या दुरध्वनीवर संदेश (एसएमएस) प्राप्त होतील परंतु, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून राहू नये, तर आरटीई संकेतस्थळावर जाऊन अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी, अशा सुचना पालकांना आरटीईच्या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. परंतू त्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही, अशा पालकांना शिक्षणविभागाकडून दुरध्वनीद्वारे संपर्क साधला जाणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

Story img Loader