नागरिकांना मत नोंदविण्याचे आवाहन
ठाणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी महापालिकेने आखलेल्या आराखडय़ात सूचना आणि संकल्पनांचा अंतर्भाव करण्यासाठी प्रशासनाने ठाणेकरांची मते जाणून घेण्यासाठी पाऊल उचलले आहे. २३ ते २५ जानेवारीदरम्यान यासंबंधीची मोहीम राबवली जात असून बुधवापर्यंत ठाणेकर नागरिकांनी यामध्ये आपली मते नोंदवावीत, असे आवाहन महापौर संजय मोरे यांनी केले आहे.
स्मार्ट सिटी आराखडा तयार करण्याचा एक भाग म्हणून यापूर्वी महापालिकेने डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात नागरिकांच्या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी उपस्थितांकडून विविध प्रकारच्या सूचना पुढे येतील, अशी अपेक्षा बाळगली जात होती. मात्र, काही नागरिकांनी व्यक्तिगत प्रश्नांची सरबत्ती प्रशासनावर केल्याने महापौर संजय मोरे यांच्यासह आयुक्त संजीव जयस्वाल यांचाही भ्रमनिरस झाला. काही नागरिकांनी तर ठाणे क्लबकडून आकारल्या जाणाऱ्या सदस्य शुल्कावरही टीकेचे आसूड ओढले. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तक्रारी करणाऱ्या नागरिकांना आवरताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले.
स्मार्ट सिटीचा आराखडा तयार करताना नागरिकांच्या खुल्या चर्चेचा प्रयोग फसल्यानंतर ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा सर्वेक्षण मोहिमेच्या माध्यमातून ठाणेकरांना आपली मते मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेने यापूर्वी ऑनलाइन सूचना मागविल्या होत्या. त्यानंतर ‘माझ्या स्वप्नातील ठाणे शहर’ या विषयांवर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये ७३ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या मोहिमेचा एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिकेतर्फे दिनांक २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत सर्वेक्षण आयोजित केले असून या सर्वेक्षणासाठी संपूर्ण शहरात विविध ठिकाणी सर्वेक्षण बुथ तयार केले आहेत. या बुथवर सर्वेक्षण अर्ज भरून शहर कसे असावे यासंबंधीच्या सूचना, मते मांडण्याची संधी ठाणेकरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा