कल्याण – टेम्पोच्या चेसीसच्या खाली एक चोर कप्पा करून त्यामधून विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्यांना कल्याण उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कौशल्याने अटक केली आहे. या टेम्पोतून विदेशी मद्याचा पाच लाखाहून अधिक किमतीचा मद्यसाठी पथकाने जप्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुष्पा चित्रपटात चंदन तस्करी करण्यासाठी टेम्पोच्या चेसीसखाली एक चोरकप्पा तयार करण्यात आला होता. अशाच पध्दतीने या टेम्पोत चोरकप्पा तयार करून त्यामधून विदेशी मद्याची तस्करी करण्यात येत होती. दमण-दादरा नगर हवेली येथून विदेशी मद्याचा मोठा साठा छुप्या पध्दतीने एका टेम्पोत चोरकप्पे तयार करून वाडा-शहापूर मार्गे आणण्यात येत आहे अशी गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

या माहितीप्रमाणे पथकाने वाडा-शहापूर मार्गावर सापळा लावला होता. उत्पादन शुल्क विभागाचे कल्याण विभागाचे निरीक्षक दीपक परब आणि पथक या कारवाईत सहभागी झाले होते. वाडा-शहापूर मार्गावर ठिकठिकाणी संशयास्पद टेम्पो, ट्रकची तपासणी अधिकारी करत होते. ही तपासणी सुरू असताना एक रिकामा टेम्पो अधिकाऱ्यांच्या समोरून जात होता. या टेम्पोत काही नव्हते. पण अधिकाऱ्यांना या टेम्पोचा संशय आला. त्यांनी पुढे जाऊन या टेम्पोच्या चालकाला थांबविण्याचा इशारा केला.

चालकाने टेम्पो थांबून तो पसार झाला. त्याचा साथीदार हरीसिंग गेहलोत पळू न शकल्याने त्याला पथकाने ताब्यात घेतले. चालक पळून गेल्याने या टेम्पोत नक्की काही तरी आहे याचा संशय बळावला. पोलिसांनी काटेकोरपणे या टेम्पोची तपासणी सुरू केली. अधिकाऱ्यांनी टेम्पोच्या खालील बाजूस चेसीसच्या दिशेने पाहिले तर त्यांना तेथे वाहन यंत्रांच्या बाजुला चोरकप्पे दिसले. हे चोरकप्पे पथकाने फोडून काढले. त्यामध्ये विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्या.

हे विदेशी मद्य महाराष्ट्रात आणून बेकायदा विक्री करण्याचा संबंधिताचा डाव यामुळे उधळला गेला.