पोपट पक्षी म्हटला की भारतीय पोपट पक्षी डोळ्यासमोर येतो. मात्र याच पोपटाच्या अनेक परदेशी प्रजाती आहेत. पोपटाच्या या विदेशी प्रजातींनी पक्षीप्रेमींवर भुरळ घातली आहे. ऑस्ट्रेलियातील मूळ असलेला कॉकॅटो पक्षी सध्या जगभरातील पक्षीप्रेमींच्या पसंतीस पडत आहे. पोपटासारखाच दिसायला आकर्षक असणाऱ्या कॉकॅटो पक्ष्याच्या अनेक उपप्रजाती आहेत. यापैकी सल्फर क्रेस्टेड कॉकॅटो या पक्ष्याने आपल्या आकर्षक रूपामुळे पक्षीप्रेमींना आकर्षित केले आहे. संपूर्ण पांढऱ्या रंगाचे शरीर, काळी चोच आणि डोक्यावर तुरा यामुळे हा पक्षी अधिक सुंदर दिसतो. पूर्ण वाढ झालेला हा पक्षी बोलायला लागल्यावर किंवा आपला राग दर्शवण्यासाठी डोक्यावरील तुरा फुलवतो. ब्लॅक कॉकॅटो, कॅनबिज ब्लॅक कॉकॅटो, मेजर मिशेल्स कॉकॅटो, गँग गँग कॉकॅटो, व्हाईट कॉकॅटो, ब्लू आय कॉकॅटो, रेड वेंटेड कॉकॅटो अशा या पक्ष्याच्या काही उपप्रजातीही आहेत. मात्र जगभरात व्हाइट कॉकॅटो आणि सल्फर क्रेस्टेड कॉकॅटो या पक्ष्यांना मागणी जास्त आहे. सल्फर क्रेस्टेड कॉकॅटो या संपूर्ण पांढऱ्या रंगाच्या पक्ष्याच्या डोक्यावर पिवळा तुरा शोभून दिसतो. पाहताच क्षणी भुरळ पाडणाऱ्या या पक्ष्याच्या आकर्षक रूपामुळे जगभरात या पक्ष्यांना अधिक मागणी आहे. काही लाखांपर्यंत हे पक्षी बाजारात उपलब्ध होतात. मूळचे जंगलातील हे पक्षी असले तरी वाढत्या मागणीमुळे कॅप्टिव्हिटीमध्येही या पक्ष्यांचे ब्रिडिंग होते. इंडोनेशिया, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया या देशात हे पक्षी मोठय़ा प्रमाणात आढळतात.
भारतातही हैद्राबाद, कलकत्ता, पुणे, बंगळुरू येथे या पक्ष्यांचे कॅप्टिव्हिीटीमध्ये ब्रिडिंग केले जाते. नर आणि मादी यातील फरक ओळखता येत नसल्याने डीएनए चाचणी करून या पक्ष्यांचे ब्रिडिंग केले जाते. हे पक्षी पटकन माणसाळत नाहीत. घरात पाळण्यासाठी हे पक्षी उत्तम असले तरी लहान असतानाच या पक्ष्यांना घरात पाळण्यास सुरुवात केल्यास या पक्ष्यांना माणसांची सवय होते. अन्यथा अनोळखी व्यक्तींना ते इजा करण्याचा संभव असतो. कमीतकमी अनोळखी व्यक्ती या पक्ष्यांच्या सान्निध्यात येण्यासाठी काळजी घ्यावी लागते. साधारण तीस ते चाळीस वर्षांचे आयुष्य या पक्ष्यांना लाभले आहे. कॉकॅटो जातींपैकीच कॉकेटील्स हे लहान आकारातील पक्षीही लोकप्रिय आहेत. घरात पाळण्यासाठी हे पक्षी उत्तम आहेत. कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी हे पक्षी प्रयत्नशील असतात. घरात खेळण्यासाठी, दंगा करण्यासाठी कायम तत्पर असणारे कॉकॅटो कायम उत्साहवर्धक असतात. या पक्ष्यांचा आवाज कर्कश असला तरी घरातील सदस्यांचे उत्तम मनोरंजन करतात. फळे, गवत, फळांच्या बिया, फुले, कीटक असा आहार या पक्ष्यांना उत्तम ठरतो.
बर्ड शोमध्ये अग्रेसर
परदेशात होणाऱ्या बर्ड शोमध्ये कॉकॅटो पक्षी पाहायला मिळतात. या पक्ष्यांना बोलण्याचे प्रशिक्षण दिल्यास काही प्रमाणात हे पक्षी बोलू शकतात. पिंजऱ्यातील कसरतीसाठी या पक्ष्यांना प्रशिक्षण दिले जाते. कसरतीसाठीही हे पक्षी विशेष नावाजले जातात. एखादी वस्तू ओढत नेणे, लहान लाकडी सायकल फिरवणे यांसारख्या कसरती करण्यासाठी बर्ड शोमध्ये कॉकॅटो पक्षी अग्रेसर असतात.
ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ
कॉकॅटो पक्षी शेतातील पूर्ण वाढलेले पीक खात असल्यामुळे ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांसाठी हे पक्षी कर्दनकाळ ठरतात. विशेष म्हणजे पिकाची पूर्ण वाढ झाल्याची चाहूल लागताच कॉकॅटो पक्ष्यांची संपूर्ण टोळी शेतावर धाड टाकून पीक फस्त करतात. या कारणामुळे ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांसाठी हा नावडता पक्षी ठरत आहे.