बदलापूर : बदलापूर वनपरिक्षेत्रातील सोनावळा परिमंडळात कान्होर जवळ राखीव जंगलात खेैर जातीच्या झाडाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना वन विभागाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून टेम्पो, दुचाकी आणि खैर जातीची लाकडे जप्त करण्यात आली आहेत. या दोघांनाही न्यायालयासमोर सादर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बदलापूर वनपरिक्षेत्र एक संपन्न क्षेत्र म्हणून ओळखले जाते. मलंगगडाच्या डोंगरापासून ते थेट बारवीपर्यंत असा विस्तीर्ण परिसरात घनदाट वनसंपदा आहे. त्यामुळेे येथे जंगली प्राण्यांची संख्याही चांगली आहे. अनेकदा या भागात प्राण्यांचा वावर दिसून आला आहे. बिबट्याचाही वावर येथे असल्याचे अनेकदा दिसून आला होता. मात्र या भागातील वनसंपदेवर अनेकांचा डोळा असतो. लाकूड माफिया या जंगलाकडे व्यवसायाच्या दृष्टीने पाहतात. बदलापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत सोनावळा वनपरिमंडळातील मौजे कान्होर या राखीव वनक्षेत्रात खैर प्रजातीचे मौल्यवान वृक्षतोड करुन त्यांची वाहतूक करण्याच्या प्रयत्नात असताना २ जणांना रंगेहात पकडण्यात आले.

वन विभागाचे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत माल वाहतूक टेम्पो, दुचाकी वाहन आणि खैर प्रजाती वनोपज माल जप्त करण्यात आला आहे. यावेळीहनीफ मैनुद्दिन मुल्ला आणि राशिद हनीफ मुल्ला या बदलापुरात राहणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ आणि महाराष्ट्र नियमावली २०१४ चे कलमांन्वये वन गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या आरोपींना उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. तसेच वनपरिमंडळ अधिकारी सखाराम राठोड गुन्हयाचा पुढील तपास करत आहेत. यामागे मोठी साखळी आहे का, हेही तपासण्याचे मोठे आव्हान आता वन विभागपुढे आहे.
खैर महत्वाचे का

खैर वृक्षांच्या खोडातील गाभ्यावर प्रकीया करुन त्यापासून कात आणि गुटखा तयार केला जातो. त्यामुळे खैर वृक्षांना खुप मागणी आहे. खैर तस्करीचे मोठे रॅकेट महाराष्ट्र आणि लगत राज्यांमध्ये सक्रीय असल्याचे वारंवार बोलले जाते. विशेषतः कोकण भागतील जंगलातील खैर वृक्षांना प्रचंड मागणी असल्याने खैर तस्करीचे अनेक प्रकार वारंवार घडत असतात. बदलापूर वनविभागाच्या या कारवाईमुळे लाकडू माफीयांचे धाबे दणाणले आहेत. लवकरच इतर आरोपींचाही शोध घेतला जाईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे यांनी सांगितले आहे.