जागतिक वनदिनीही वणवा रोखण्यात अपयश
देशातील वनसंपत्ती वाचावी व तिचे संवर्धन व्हावे या हेतूने शासनाकडून मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न केले जातात. वनांच्या संरक्षणासाठी राज्यातील वन विभाग सक्रिय असतो, मात्र गेल्या दोन दिवसांपासून बदलापूर शहराला लागून असलेल्या टावलीचा डोंगर ते चंदेरी किल्ला या डोंगररांगांतील भागात वणवा लागलेला असून जागतिक वन दिनीही वनविभागाचे याकडे लक्ष नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बदलापूर शहराच्या पूर्वेकडे असलेल्या डोंगररांगा गेल्या दोन-तीन दिवसांपासून जळताना दिसत आहेत. रात्रीच्या वेळी आगीचे लोट स्पष्टपणे जाणवतात. शहराच्या कोणत्याही भागातून हा वणवा आपल्याला दिसू शकतो. त्यामुळे त्या वणवण्याची भीषणता कळते. मात्र या आगीत ससा, मुंगूस यांसारखे वन्यजीव, प्राणी आणि पक्षी, त्यांची घरटी पूर्णपणे नष्ट होण्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. मात्र वनविभाग या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवून आहे, असे अधिकारी सांगत असले तरी गेल्या दोन दिवसांपासूनही आगीवर नियंत्रण का मिळवले जात नाही, असा सवाल आता पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत.
तीन महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारचे वणव्याचे प्रकार समोर आले होते. त्या वेळी ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये वृत प्रसारित करण्यात आले होते. त्यानंतर काही काळ या वणव्याचे प्रकार थांबल्याचे दिसून आले, मात्र आता पुन्हा वणव्याचे प्रकार सुरू झाल्याने हे वणवे मानवनिर्मित की नैसर्गिक असा प्रश्न नागरिक विचारत आहे. कोळशासाठी, तसेच वन्यजीवांची शिकार करण्यासाठी अशा प्रकारे आग लावली जाते असे बोलले जाते. मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाकडे प्रभावी यंत्रणा नसल्याचे सिद्ध
होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा