ठाणे जिल्ह्यात वाढत्या नागरीकरणामुळे जंगल संपत्तीचा मोठय़ा प्रमाणावर ऱ्हास झाला असला तरी तरी अंबरनाथ तालुक्यात बदलापूरपासून अवघ्या दहा-बारा किलोमीटर अंतरावर अद्याप नैसर्गिक हिरवाई मोठय़ा प्रमाणात टिकून आहे. पावसाळ्यापूर्वी पौर्णिमेच्या रात्री जंगलांमधील पाणवठय़ावर पहारा ठेवून तिथे येणाऱ्या प्राण्यांचे निरीक्षण करीत प्राणिगणना करण्याची पारंपारिक पद्धत वनखात्यात प्रचलीत आहे. गेल्या सोमवारच्या रात्री बदलापूर वनक्षेत्राचे परिक्षेत्र अधिकारी तुळशीराम हिरवे यांनी याच पद्धतीचा अवलंब करून जंगलातील पाणवठय़ावर पहारा दिला. या निरीक्षणात एखाद-दुसरे साळींदर आणि रान डुकराचा अपवाद वगळता पाणवठय़ावर फारसे कुणी आलेले आढळले नसले तरी या जंगलात बिबटय़ा, कोल्हा, भेकर, ससे, हरण, वानर, मोर आदी प्राणी आहेत. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे पक्षीही या जंगलात आढळतात, अशी माहिती हिरवे यांनी दिली. जंगलात आतमध्ये आणखी काही पाणवठे असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.  
साधारणपणे माथेरान ते मलंग डोंगर रांगांच्या काठी अंबरनाथ तालुक्याच्या हद्दीत जवळपास हजार हेक्टर सदाहरित जंगल आहे. वनखात्यामार्फत चिंचवली ग्रामस्थांच्या सहकार्याने संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येत असून त्यामार्फत पर्यटकांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

रस्ता नसल्याने जंगल वाचले
शहरापासून अगदी जवळ असले तरी या जंगलात जाण्यासाठी अरुंद पायवाटांशिवाय दुसरा कोणताही रस्ता नाही. बेंडशीळ गावाजवळील चिकणीची वाडीतील ग्रामस्थ जंगलातून सरपणासाठी लागणारे लाकूड डोक्यावरून वाहून आणतात. त्याचा अपवाद वगळता हे जंगल मानवी लुडबुडीपासून अद्याप अस्पर्शित राहिले आहे, अशी माहिती चिकणीची वाडीतील सुरेश हंबीर, पांडुरंग निरगुडा, लक्ष्मण सीद तसेच चिंचवलीतील चंदर गावंडा यांनी दिली
पाण्याचे स्रोत
या जंगलात अगदी बारमाही अस्तित्त्वात असणारे शुद्ध पाण्याचे अनेक जिवंत स्त्रोत आहेत. डोंगरातून वाहणारे हे पाणी अतिशय शुद्ध आहे. या नाल्यांवर छोटे बंधारे बांधले तर भविष्यात मोठय़ा प्रमाणात जल संवर्धन होऊ  शकेल.