वनविभागाच्या प्रयत्नांना मुरबाडच्या वनात यश; टोकावडे परिसरातील जंगलात तीन वर्षांत एकही वणवा नाही
वन विभागाने स्थानिकांना विश्वासात घेतल्यामुळे मुरबाड तालुक्यातील जंगलाचा ऱ्हास रोखला जाऊन परिसरात बऱ्यापैकी वनसंवर्धन झाले आहे. त्यामुळे जंगलात वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून गेल्या महिन्यात झालेल्या प्राणीगणनेत इतर वन्यप्राण्यांसोबत बिबळ्याचे अस्तित्व आढळून आले आहे. पश्चिम घाट डोंगर रांगांनी वेढलेल्या मुरबाड तालुक्यालगत जुन्नर, भीमाशंकर भागांत घनदाट जंगल आहे. मुरबाडमधील माळशेज, नाणघाटातही बऱ्यापैकी वृक्षसंपदा आहे. मात्र सातत्याने लागणाऱ्या वणव्यांमुळे मोठय़ा प्रमाणात जंगल संपदेचा ऱ्हास होत होता. वन विभागातर्फे जाळरेषा घेऊनही वणव्यांची डोकेदुखी कायम होती. मात्र स्थानिक गावपाडय़ांना लगतच्या जंगलाच्या संवर्धनाचे अधिकार दिल्यानंतर वणव्याची चिंता मिटली आहे. गेल्या तीन वर्षांत टोकावडे परिसरातील जंगलात एकही वणवा लागला नसल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुरबाडमधील अनेक गावकऱ्यांनी त्यांच्या वाटय़ाला आलेल्या जंगलपट्टय़ाचे डोळ्यात तेल घालून रक्षण सुरू केले आहे. मुरबाड तालुक्यातील १४ गावांचे सामूहिक वन हक्क शासनाने मान्य केले आहेत. त्यापैकी प्रत्येक गावाला किमान ४६ हेक्टर ते कमाल २०० हेक्टर जंगल राखण्यासाठी मिळाले आहे.
गावकऱ्यांनी आपल्या वाटय़ास आलेल्या जंगलपट्टय़ाचे रक्षण करण्यासाठी निरनिराळे उपाय योजले आहेत. त्यात चोरवाटा बंद करणे, ट्रॅक्टर किंवा ट्रकसारखे वाहन जंगलात जाऊ नये म्हणून वाटेत चर खोदणे आदी उपाय योजण्यात आले आहेत. सरपणासाठी फक्त झाडाच्या सुकलेल्या फांद्याच तोडण्याचा दंडक गावकऱ्यांनी स्वत:हून घालून घेतला आहे. त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत.
रानडुक्कर, भेकरसोबत बिबळय़ाचाही वावर
यंदा तालुक्यातील टोकावडे परिक्षेत्रातील मढ, वैशाखरे आणि भिदणी वाघवाडी येथील काळू नदीच्या पात्राजवळ वन विभागाने प्राणीगणना केली. त्यात रानडुकरे, वानरे, ससे, भेकर, नीलगाय हे प्राणी पाणवठय़ावर दिसले. मढ परिसरात बिबळ्याचे अस्तित्व आढळून आल्याची माहिती वनक्षेत्रपाल टी. डी. हिरवे यांनी दिली. तालुक्यातील शिरवाडीत मोरांनीही गावकऱ्यांना नुकतेच दर्शन दिल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यां अॅड. इंदवी तुळपुळे यांनी दिली.