ठाणे : ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मामा भाचे डोंगरावर काही दिवसांपूर्वी आग लागून अनेक वृक्ष जळून खाक झाली होती. परिसरातील गर्दुल्ले आणि अनधिकृतपणे राहणारे लोक नशा करत असल्याने ही आग जाणीवपूर्वक लावल्याचा संशय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी व्यक्त केला होता. त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र देऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. नुकतीच पाचंगे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली. त्यावेळी या गर्दुल्ल्यांचा बंदोबस्त करणार असून जंगलात सीसीटीव्ही बसविणार असल्याचे आश्वासन वन मंत्र्यांनी दिल्याचे पाचंगे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वीच मामा भाचे डोंगर येथे भीषण आग लागली होती. या आगीत अनेक वृक्ष भस्मसात झाली. वृक्षांवरील पक्षी, किटक यांचाही यामुळे निवारा नष्ट झाला. आगीमुळे येथील निसर्गसंपदेचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच मनसेचे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी वन मंत्री गणेश नाईक यांना याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती.

येथील जंगलात काही गर्दुल्ले आणि अनधिकृतपणे राहणारे काही लोक नशेसाठी जातात. या गर्दुल्ल्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली होती. यापूर्वी त्यांनी वन विभागाच्या सुमारे १२०० चौरस मीटर जागेवर झालेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर वनविभागाने गुन्हा दाखल केला. मात्र राजकीय दबावामुळे कारवाई पूर्णत्वास जाऊ शकली नाही. या भागातील अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झालेला दिसून येत असल्याचा आरोपही पाचंगे यांनी केला होता.

पाचंगे यांनी नुकतीच वन मंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावेळी गणेश नाईक यांनी येथील गर्दुल्ल्यांचा बंदोबस्त करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच जंगलात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे आगीचे प्रकार रोखता येऊ शकता असे आश्वासनही त्यांनी दिल्याचे संदीप पाचंगे यांनी सांगितले.

अनधिकृत वसाहत आणि वाढती लोकसंख्या सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय

वायू दलाच्या तळा जवळच असलेल्या कान्हेरी हिल परिसरातील मामा-भांजे दर्ग्याच्या आसपास काही अनोळखी लोक स्थलांतरित झाले आहेत. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा धोका निर्माण झाला आहे. भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनीही या संदर्भात तक्रार नोंदवली होती. राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत होणारी अनधिकृत वसाहत आणि वाढती लोकसंख्या सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनली आहे, असेही पाचंगे यांनी म्हटले होते.