ठाणे : ठाणे हे आपले सर्वांचेच असल्याचे सांगत या शहरातील अडीअडचणी सोडविण्यासाठी गरज पडली तर, अधिकाऱ्यांची बैठक घेऊ, असे विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी रात्री ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केले. तसेच जनता दरबार कोणीही कुठेही घेऊ शकतो, असा पुनरुच्चार करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मंत्र्यांनाही नवी मुंबईत जनता दरबार घेण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले.

ठाणे येथील पाचपाखाडी भागात वंदे मातरम संघाच्या वतीने माघी गणेशोत्वासाचे आयोजन करण्यात आले असून येथे बुधवारी रात्री वनमंत्री गणेश नाईक हे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जनता दरबारबाबत भाष्य केले. ठाणे जिल्ह्याचा अधिकृत संपर्कमंत्री म्हणून माझी नेमणुक झाली आहे. तर, पालघर जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, असे नाईक म्हणाले. जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो. महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे हा जनता दरबार घ्यावा. जनता दरबार म्हणजे लोकांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्या दूर करणे. यात काहीच वावग नाही, असे नाईक म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मंत्र्यांनाही सांगितले आहे की, नवी मुंबईत जनता दरबार घ्या, असेही ते म्हणाले.

भाईंदरपासून ते गुजरात सीमेपर्यंत होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवरही आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. या संदर्भात मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. त्यात एप्रिल किंवा मे महिन्यापर्यंत हा रस्ता पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पोलीस अधीक्षक तसेच इतर अधिकाऱ्यांना हा प्रश्न सोडविण्यासाठी सूचना केल्या आहेत. मनोर-वाडा रस्त्याच्या कामाबाबतही बैठक घेतली. हि बैठक घेण्याबाबत कुणीही सांगितले नव्हते. मला या समस्येबाबत जाणीव झाल्याने ही बैठक घेतली, असेही ते म्हणाले. ठाणे हे आपले सर्वांचेच आहे. या शहरातील अडीअडचणी दूर करण्याकरिता गरज पडली तर अधिकाऱ्यांची बैठक घेऊ, असेही ते म्हणाले.

गेल्या आठवड्यात ठाण्यातील एका सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारबाबत भाष्य केले होते. ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याची घोषणा नाईक यांनी यावेळी केली होती. त्यानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण तापले होते. या विधानाबाबत शिवसेना ( शिंदे गट) नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाष्य करत महायुतीमधील कोणताही मंत्री जनतेत जाऊन समस्या जाणून घेऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले होते. आता नाईक यांनी पुन्हा जनता दरबारबाबत विधान करत उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांच्या मंत्र्यांना नवी मुंबईत जनता दरबार घेण्यास सांगितले आहे.

Story img Loader