ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा लागला पाहिजे, अशी इच्छा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची असल्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनी सांगिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच, आता वनमंत्री गणेश नाईक यांनीही पालिका निवडणुकींबाबत भाष्य केले आहे. मला स्वबळावर निवडणुका लढायला आवडते, पण पक्षाने निर्णय घेतला तर एकत्र लढू असे नाईक यांनी म्हटले असून त्यांचे हे विधान आता शहराच चर्चेचा विषय बनले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे शहर ओळखले जाते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचे दाखवून दिले होते. त्यांच्या बालेकिल्ल्यात आता मित्र पक्ष असलेल्या भाजपने आपली ताकद वाढविण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे भाजपने ठाणे जिल्हा संपर्क पदाची जबाबदारी दिली आहे. त्यांनी जनता दरबाराची घोषणा केली, तेव्हापासून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दरबाराचे राजकीय महत्व वाढले असतानाच, जनता दरबाराच्या एक दिवस आधी माजी खासदार संजीव नाईक यांनी पालिका निवडणुकांबाबत सुचक विधान केले होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जेव्हा ठाण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा लागला पाहिजे. त्यामुळे युती करायची की नाही करायची हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील आणि नेते जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल, असे संजीव नाईक म्हणाले होते. त्यापाठोपाठ सोमवारी जनता दरबार घेण्यापुर्वी वनमंत्री गणेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना पालिका निवडणुकांबाबत भाष्य केले. १९९५ साली मी मंत्री झालो, तेव्हापासून जनता दरबार घेतो. ठाणे शहर, मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेत आहे. त्यामुळे जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नाही.
महायुती म्हणुन आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतोय. त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा जनता दरबार आयोजित केल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आम्ही सर्व मंत्री एकमेकांना पूरक काम करत आहोत. एकूणच महाराष्ट्र थांबणार नाही, या टॅग लाईनप्रमाणे आम्ही सर्वजण कामाला लागलो आहोत.
आपली गाऱ्हाणे मांडण्यासाठी सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाही. मंत्र्यांना कुठे भेटायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. त्यामुळेच जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा जनता दरबार घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. तसेच मला स्वबळावर निवडणुका लढायला आवडते, पण पक्षाने निर्णय घेतला तर एकत्र लढू असेही नाईक यांनी स्पष्ट केले. त्यांचे हे विधान शहरात चर्चेचा विषय बनले आहे.