ठाणे : शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात जनता दरबाराचे आयोजन करून वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह दिल्याची चर्चा रंगली असतानाच, त्यावर आता वनमंत्री नाईक यांनी सोमवारी स्पष्टीकरण दिले. जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नव्हे तर जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी महायुती म्हणून तिन्ही पक्ष प्रयत्न करीत असून त्यासाठीच हा जनता दरबार आयोजित केल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
ठाणे येथील खारकर आळी भागातील रघुवंशी हॉल मध्ये सोमवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला. यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जनता दरबार घेण्यामागचे कारण स्पष्ट केले. १९९५ साली मी मंत्री झालो, तेव्हापासून जनता दरबार घेतो. ठाणे शहर, मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेत आहे. त्यामुळे जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नाही. महायुती म्हणुन आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतोय. त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा जनता दरबार आयोजित केल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आम्ही सर्व मंत्री एकमेकांना पूरक काम करत आहोत. एकूणच महाराष्ट्र थांबणार नाही, या टॅग लाईनप्रमाणे आम्ही सर्वजण कामाला लागलो आहोत. आपली गाऱ्हाणे मांडण्यासाठी सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाही. मंत्र्यांना कुठे भेटायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. त्यामुळेच जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा जनता दरबार घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. जनता दरबारात निवेदने स्वीकाराली जातील आणि १५ दिवसात त्यावर काय कारवाई झाली, याचा आढावा पुढच्या जनता दरबारात घेतला जाईल, असे नाईक म्हणाले.