शिरवाडी, तालुका-मुरबाड
धसईपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्यापासून थोडे आत शिरले की आपण शिरवाडी गावात येऊन पोहोचतो. शंभर टक्के आदिवासी असलेल्या या गावात अवघी ३५ घरे आहेत, लोकसंख्या नेमकी सांगायची झाली तर १९९. मात्र सामूहिक वनहक्काद्वारे मिळालेल्या ४३ हेक्टर जागेत गेल्या दोन वर्षांत अतिशय चांगले जंगल राखून या गावाने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. जंगलसंपदा आणि किंबहुना पर्यावरण रक्षणात स्थानिकांचा सहभाग किती मोलाचा ठरतो, हेच शिरवाडीकरांनी दाखवून दिले आहे..
शिरवाडी ही नाणेघाट आणि माळशेजघाट परिसरातील अनेक वाडय़ा-वस्त्यांपैकी एक आदिवासी वस्ती. कुणाच्याही खिजगणतीत नसलेली. पारंपरिक भात, नाचणी, वरी, उडीद ही पावसाळी पिके हेच उपजीविकेचे मुख्य साधन. गावातील काही तरुण शेजारच्या गावांमध्ये मोलमजुरीसाठी जातात, पण त्यांचे प्रमाण कमी आहे. गावात जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे. त्यापुढील शिक्षणासाठी येथील मुलांना धसई गाठावे लागते. मुरबाड आणि शहापूर या दोन्ही तालुक्यांमधील बहुतेक गावांच्या पाणी योजनांचा बट्टय़ाबोळ उडाला आहे. नित्कृष्ट दर्जामुळे अनेक पाणी योजना बंद आहेत. काही अर्धवट आहेत, तर काही चक्क कागदावर. शिरवाडीतही पाणी संकलित करण्यासाठी मोठी टाकी बांधलेली दिसते. मात्र त्या टाकीत कधीही पाणी चढले नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावात टाकलेल्या वाहिन्यांद्वारे जेमतेम महिनाभर पाणी आले, नंतर ती बंद पडली. त्यामुळे योजना ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी होत्या की ठेकेदारांची बिले काढण्यासाठी, असा प्रश्न पडतो.
त्यामुळे साहजिकच गावात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पिण्यासाठी जेमतेमच पाणी उपलब्ध असल्याने इच्छा असूनही पावसाळ्याव्यतिरिक्त ग्रामस्थ शेती करू शकत नाहीत. वाडीतील जवळपास सर्वच घरांचा स्वयंपाक चुलीवर होतो. त्यासाठी लागणारे सरपण स्थानिक रहिवासी शेजारच्या जंगलातून गोळा करीत. मात्र गेली दोन वर्षे त्यांनी जंगलातून लाकडे आणणे बंद केले आहे. कारण त्यांना त्यांच्या हक्काचे वनक्षेत्र मिळाले असून त्यावर त्यांना घनदाट जंगल उगवून दाखवायचे आहे. समस्त गावकऱ्यांनी तसा निर्धारच केला आहे. त्यामुळे सरपणासाठी लागणारी लाकडे गावकरी विकत घेतात, पण जंगलातून एकही लाकूड आणत नाहीत. ‘हक्क आणि कर्तव्य’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखाद्या गोष्टीवर तुम्ही हक्क सांगत असाल तर त्याचे रक्षण करण्याची जबाबदारीही स्वीकारावी लागते. व्यावहारिक जगातले हे शहाणपण शिरवाडीकरांनी अंगी बाणवले आहे. जंगलसंपत्तीचे मोल त्यांनी जाणले आहे. वनविभागाने त्यांना ४३ हेक्टरचा पट्टा जंगल राखण्यासाठी दिला आहे. त्या पट्टय़ातील २५ हेक्टर जागेत दोन वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी नव्याने वृक्षलागवड केली आहे. केवळ लागवड करून भागणार नाही, याची ग्रामस्थांना कल्पना असल्याने त्यांनी डोळ्यात तेल घालून ते राखले आहे. शेजारील गावचे लोक शिरवाडीच्या हद्दीत येऊन लाकूडतोड करीत. ते टाळण्यासाठी शिरवाडी ग्रामस्थांनी पत्रके काढून ती आजूबाजूच्या गावात वाटली. त्यामुळे जंगलसंपदा राखली गेली. सुरुवातीच्या काळात वनविभागाने रोजगार हमी योजनेतून एका व्यक्तीस जंगल राखण्यासाठी नेमले. त्यानंतर गावकऱ्यांनी आळीपाळीने जंगलाची राखण करण्यास सुरुवात केली. पूर्वी या भागात वरचेवर वणवे लागून हजारो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडत. गावकऱ्यांनी लक्ष घातल्यानंतर वणव्याचे प्रमाण कमी झाले आहे. वणव्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून हद्दीच्या जंगलाभोवती चर खोदण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. गावात अलीकडेच एक कूपनलिका खोदण्यात आली असून त्यामुळे किमान घरगुती वापरण्यापुरते का होईना मुबलक पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे. मात्र जवळच असलेल्या धसई नदीतून अथवा धसई धरणातून गावकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले, तर गावकऱ्यांना दुबार पीक घेता येणे शक्य होणार आहे.
जंगलावर तिथे राहणाऱ्या स्थानिकांचा नैसर्गिक हक्क आहे. या दोन्ही व्यवस्था एकमेकांवर अवलंबून आहेत. गेली अनेक वर्षे मुरबाडमध्ये कार्यरत श्रमिक मुक्ती संघटना शासनदरबारी आदिवासींच्या या न्याय हक्कांसाठी पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे अखेर शासनानेही आदिवासींचा जंगलावरील हक्क मान्य करून त्यांना सामूहिक वनहक्क बहाल केले आहेत. शिरवाडीकरांनी हक्कासोबत कर्तव्यही बजावून वनाचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही या गावातील प्रयत्नांची वाखाणणी केली आहे. श्रमिक मुक्ती संघटनेने यंदा जागतिक पर्यावरणदिनी शिरवाडीत हिरव्या देवाची जत्रा भरवली. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर जत्रेस उपस्थित राहिले. त्यांनी गावकऱ्यांना राखीव जंगलावर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी बुरुज देण्याचे आश्वासन दिले. लवकरच गावात टेहळणी बुरुज उभारण्यात येणार आहे.
अशी आहे वनसंपदा
या परिसरातील जंगलात आईन, साग, धावडा, सावर, शिवण, पळस, मोह, जांभूळ, बांबू, बोंडारी, कूड, टेचू, भोकर, उंबर, करवंद आदी झाडे आहेत. त्यात आता नव्याने केलेल्या लागवडीत काजू, सीताफळ, आवळा आदी फळझाडांचा समावेश आहे. आपण करीत असलेले वृक्षसंवर्धन ही भविष्यातील गुंतवणूक असल्याची जाणीव गावकऱ्यांना आहे. त्याची फळे काही वर्षांनी चाखायला मिळतील, असा त्यांना विश्वास आहे.
राखीव जंगलात ‘मोर’
अवघ्या दोन वर्षांत या वृक्षसंवर्धनाचे चांगले परिणाम शिरवाडीकरांना दिसले. त्यातले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी राखलेल्या जंगलात चक्क मोर बागडू लागले. त्यापूर्वी कधीही गावच्या हद्दीत मोर दिसले नव्हते. कारण अर्थातच जंगल उजाड झाले होते. मात्र गावाभोवती हिरवाई दिसताच घाटमाथ्यावरील जंगलांमधील मोरांनी येथे दर्शन देण्यास सुरुवात केली आहे.
हवे पाणी आणि इंधन
गावकऱ्यांना उन्हाळी शेती करण्यासाठी पुरेसे पाणी तसेच स्वयंपाकासाठी गॅस हवा आहे. सध्या त्यांच्या स्वयंपाकाची भिस्त चुलीवरच असून त्यासाठी नाइलाजाने त्यांना लाकडे जाळावी लागत आहेत. गावात गॅस आले तर चुलीला रामराम करता येईल, असे राजाराम दरोडा यांनी सांगितले.