कल्याण – कल्याण-डोंबिवली ते हेदुटणे या २१ किलोमीटर लांबीच्या वळण रस्त्याच्या टप्प्यातील टिटवाळा ते कल्याण हा महत्त्वाचा टप्पा बांधून पूर्ण झाला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा बाराशेहून अधिक सावली देणारे वृक्ष लावण्याचे नियोजन पालिकेच्या उद्यान विभागाने केले आहे. जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून रविवारी गांधारी ते दुर्गाडी चौकापर्यंतच्या रस्त्यावर चारशे रोपांची लागवड करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लावलेले प्रत्येक झाड जगेल यादृष्टीने त्याचे नियोजन केले जाणार आहे. या झाडांची निगा, देखभाल केली जाणार आहे. येत्या वर्षभरात पहिल्या टप्प्यातील वळण रस्त्याचा दुर्गाडी ते गांधारीपर्यंतचा दुतर्फा परिसर हिरवाईने नटलेला असेल, असे मुख्य उद्यान अधीक्षक आणि पालिका सचिव संजय जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा – ठाणे जिल्हा १ जूनपूर्वी खड्डे आणि वाहतूक कोंडी मुक्त करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

वळण रस्त्याचे टप्पे पूर्ण होतील, त्याप्रमाणे रोपांच्या लागवडीचे नियोजन केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात गांधारी-दुर्गाडी, त्यानंतर कल्याण, पत्रीपूल, कांचनगाव, कुंभारखाणपाडा, गणेशनगर, देवीचापाडा, मोठागाव भागातील रस्त्यांवर झाडे लावली जातील. या वृक्ष लागवडीसाठी अनेक सामाजिक, निसर्गप्रेमी संस्था पुढे आल्या आहेत. देव इंजिनिअरिंग या ठेकेदाराकडून पहिल्या टप्प्यात पर्यावरणाचा समतोल राखणारी रोपे वळण रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक शाळा, महाविद्यालयांशी संपर्क करून त्यांच्याकडून वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने या रस्त्याच्या दुतर्फा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रोपे लावण्याचा विचार आहे, असे अधीक्षक जाधव यांनी सांगितले.

ताम्हण, बकुळ, जांभूळ, मोहगणी, कदंब, सप्तपर्णी अशा अनेक सावली देणाऱ्या वृक्षांची निवड वृक्षारोपणासाठी केली आहे. वळण रस्त्याच्या दुतर्फा विविध जातींच्या प्रजाती बहरल्या तर सावलीचा रस्ता म्हणून हा रस्ता ओळखला जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – कल्याणमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे गृहनिर्माण सोसायटी स्थापन

रविवारच्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात मुख्य उद्यान अधीक्षक जाधव, उद्यान अधीक्षक अनिल तामोरे, देव इंजिनिअरिंगचे राज पुरोहित, पालिका कर्मचारी उपस्थित होते. वळण रस्ता २१ किमी लांबीचा असून या रस्त्याचे दुर्गाडी ते पत्रीपूल ते डोंबिवली या सहा किमी रस्त्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे. ५६१ कोटी खर्चाचा हा प्रकल्प आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forestry will bloom on both sides of the kalyan dombivli loop road planning to plant twelve hundred trees ssb
Show comments