मुंबईहून मंगला एक्सप्रेसमधून प्रवास करत टिटवाळा येथील एक महिला कल्याण रेल्वे स्थानकात घाई गडबडीत उतरली. यावेळी ही महिला एक्सप्रेसमध्ये आसनावर ठेवलेला आपला मोबाईल घेण्यास विसरली. कल्याण रेल्वे स्थानकात फलाट बदलत असताना या महिलेला आपला मोबाईल एक्सप्रेस मध्ये विसरल्याचे लक्षात आले. या महिलेने तात्काळ कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडला प्रकार सांगितला. पोलिसांनी तातडीने कसारा रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली. कसारा येथे मंगला एक्सप्रेस थांबताच तेथील पोलिसांनी एक्सप्रेसमध्ये विसरलेला महिलेचा मोबाईल ताब्यात घेतला. त्या महिलेला ओळख पटवून मोबाईल परत केला.
कल्याण ते कसारा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. टिटवाळा येथे राहणारी एक महिला कमल रामचंद्र कदम या मुंबईतून मंगला एक्सप्रेसने कल्याण रेल्वे स्थानकात उतरल्या. त्यांच्या दोन्ही हातात सामानाच्या पिशव्या होतात. एक्सप्रेसमध्ये आसनावर बसलेल्या असताना त्यांनी मोबाईल आसनावर बाजुला ठेवला. उतरताना घेऊ असा विचार त्यांनी केला.
कल्याण रेल्वे स्थानकात एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची गर्दी असल्याने शुक्रवारी दुपारी मंगला एक्सप्रेस मधून त्या घाई गडबडीत कल्याण स्थानकात उतरल्या. जिने चढत असताना त्यांना मोबाईल आपल्या पिशव्यांमध्ये नसल्याचे दिसले. आपण मोबाईल एक्सप्रेसच्या आसनावर विसरलो याची जाणीव त्यांना झाली. कमल कदम यांनी तात्काळ कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. तेथे त्यांनी आपला मोबाईल मंगला एक्सप्रेस मध्ये विसरल्याचे सांगितले.रेल्वे पोलिसाने तात्काळ कसारा रेल्वे पोलिसांना संपर्क करुन मंगला एक्सप्रेस कसारा स्थानकात थांबल्यावर डबा एस एक मध्ये एका महिलेचा मोबाईल चार्जरसह विसरला आहे. तो ताब्यात घेण्याची सूचना केली.
हेही वाचा : ब्रिटनमधून आकर्षक भेटवस्तू पाठवितो सांगून पलावा येथील महिलेची ७३ लाखांची फसवणूक
ही माहिती मिळताच मंगला एक्सप्रेस कसारा स्थानकात येण्याची वेळ होताच कसारा रेल्वे स्थानकातील हवालदार पी. एस. राजेभोसले, के. एम. गायकवाड, गृहरक्षक पी. एल. राठोड, एस. बी. कामडी, एल. पी. जाधव एक्सप्रेसचा डबा थांबणाऱ्या भागात उभे राहिले. एक्सप्रेस कसारा स्थानकात येताच पोलिसांचे तपासी पथक तात्काळ डब्यात चढले. त्यांनी एक मोबाईल चार्जरसह विसरला असल्याची माहिती प्रवाशांना दिली. त्यावेळी बाजुच्या आसनावरील प्रवाशाने आपल्या समोरील आसनावर एक मोबाईल प्रवासी विसरला आहे अशी माहिती दिली.
पोलिसांनी तो मोबाईल ताब्यात घेतला. कल्याण लोहमार्ग पोलिसांना ती माहिती दिली.लोहमार्ग पोलिसांनी कमल कदम यांना कसारा येथे जाण्यास सांगितले. त्या तेथे गेल्यावर तेथील हवालदारांनी त्याची ओळख पटवून नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल त्यांना परत केला. याबद्दल कमल यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले.