ठाणे : भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे माजी स्विकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती आणि त्यांच्या कुटुंबियांवर अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ज्ञातस्त्रोतापेक्षा २९ टक्के जास्त म्हणजेच, २ कोटी १४ लाख ३३ हजार ७३४ रुपयांची अपसंपदा त्यांच्याकडे आढळल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दिली.

सिद्धेश्वर कामुर्ती (६४) हे त्यांची पत्नी कावेरी (६२) तसेच मुले श्रीकांत (३६). संकेत (३४) आणि निशिकांत (३२) यांच्यासोबत भिवंडी येथील तेलीपाडा भागात राहतात. ते भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे स्विकृत नगरसेवक होते. २०२१ मध्ये त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा…भटक्या श्वानाचा संशयास्पद मृत्यू, वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी त्यांच्या संपत्तीची एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. १९८५ ते २०२१ या कालावधीतील त्यांच्या संपत्तीची माहिती पथकाने घेतली. त्यावेळी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची एकूण संपत्ती ९ कोटी ५८ लाख रुपयांहून अधिक आढळून आली. त्यापैकी २ कोटी १४ लाख ३३ हजार ७३४ रुपयांची अपसंपदा त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांकडे होती. या प्रकरणी सिद्धेश्वर कामुर्ती आणि त्यांच्या कुटुंबियांवर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.